टेस्लाकडून भारतात इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली, मोदी सरकार आयात शुल्कात सूट देणार?

| Updated on: Sep 12, 2021 | 6:54 AM

Tesla | सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून सध्या कोणत्याही वाहन कंपनीला सूट किंवा तत्सम लाभ दिला जात नाही. त्यामुळे टेस्ला कंपनीसाठी आयात शुल्कात कपात केल्यास देशात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्या इतर कंपन्यांपर्यंत अयोग्य संदेश जाईल.

टेस्लाकडून भारतात इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली, मोदी सरकार आयात शुल्कात सूट देणार?
टेस्ला
Follow us on

नवी दिल्ली: अमेरिकेच्या टेस्ला कंपनीकडून भारतात इलेक्ट्रिक वाहननिर्मितीचा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे टेस्लाने भारतात प्रकल्प सुरु केल्यास कंपनीला विशेष सूट मिळण्याचीही शक्यता आहे. केंद्रातील अवजड उद्योग मंत्रालयाने तसे संकेत दिले आहेत. टेस्लाने प्रथम भारतात प्रकल्प उभारून वाहननिर्मितीला सुरुवात करावी. त्यानंतरच टेस्ला कंपनीला सूट देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असे अवजड उद्योग मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून सध्या कोणत्याही वाहन कंपनीला सूट किंवा तत्सम लाभ दिला जात नाही. त्यामुळे टेस्ला कंपनीसाठी आयात शुल्कात कपात केल्यास देशात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्या इतर कंपन्यांपर्यंत अयोग्य संदेश जाईल.

टेस्ला कंपनीची मागणी?

टेस्ला कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील आयातशुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. परदेशातून आयात होणाऱ्या वाहनांवर सध्या त्यांच्या इंजिनाचा आकार आणि इतर निकषांच्या आधारे 60 ते 100 टक्के आयातशुल्क आकारले जाते. मात्र, टेस्ला कंपनीने हे शुल्क 40 टक्क्यांवर आणण्याची मागणी केली होती. तसेच सामाजिक कल्याण अधिभारही 10 टक्के इतकाच असावा, असे टेस्लाचे म्हणणे आहे. आगामी काळात भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भारतात टेस्लाचा प्रकल्प स्थापन करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याची चर्चा आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहने विकणाऱ्या कंपन्या

टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कारसोबत सोलर रुफ आणि पॅनल्सचीही निर्मिती करु शकते. मात्र, टेस्ला कंपनी ही जगभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत टेस्लाचे आगमन कधी होणार, याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यात टेस्लाकडून भारतात तीन कार लाँच केल्या जाऊ शकतात. या गाड्यांची किंमत अमेरिकन बाजारपेठेत साधारण 30 लाख रुपये इतकी आहे. मात्र, भारतात लागणाऱ्या आयात शुल्कामुळे या गाड्यांची किंमत 70 लाखांच्या घरात जाईल. त्यामुळे टेस्लाकडून आयात शुल्कात कपात करण्याची मागणी केली जात आहे. सध्याच्या घडीला भारतात टाटा, हुंदाई, महिंद्रा, जॅग्वार, एमजी, ऑडी, मर्सिडीज या कंपन्यांकडून इलेक्ट्रिक कारची विक्री केली जाते.

फोर्ड कंपनी भारतातून गाशा गुंडाळणार

जगातील सुप्रसिद्ध फोर्ड ही वाहन उत्पादक कंपनी भारतामधील आपला व्यवसाय बंद करणार आहे. गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत FORD कंपनीच्या वाहनांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळेच फोर्ड कंपनीने भारतामधील आपले दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता फोर्ड कंपनीच्या भारतामधील कर्मचारी आणि ग्राहकांचं काय होणार, हा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला आहे. चेन्नई आणि गुजरातच्या साणंद येथे फोर्ड कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. हे प्रकल्प बंद पडल्याने येथील तब्बल 4000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. कंपनीकडून कमीतकमी कर्मचाऱ्यांना फटका बसेल, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे फोर्डकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे फोर्ड कंपनीची वाहने असलेल्या ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी फोर्ड कंपनी आपल्या डिलर्सच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरवत राहील. फोर्ड कंपनीकडून गाड्यांच्या इंजिन निर्यातीसाठीचे युनिट सुरु ठेवले जाऊ शकते. तसेच कंपनीची सप्लाय चेन सुरळीत राहावी, यासाठी फोर्ड कंपनीचे लहानसे नेटवर्क कार्यरत राहील.

इतर बातम्या:

फोर्ड कंपनी भारतातील गाशा गुंडाळणार, 4000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर

ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?

प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, ‘या’ कारणामुळे सर्वच वाहन कंपन्या तोट्यात