लंडन : महागड्या गाड्यांच्या किंमती आतापर्यंत तुम्ही ऐकल्याच असतील, पण कधी महागड्या नंबर प्लेट ऐकल्यात का? अनेक गाड्यांच्या नंबर प्लेट काहीशा हटके असतात, तर काही नंबर प्लेटमध्ये कलाकुसर करुन नावं बनवलेली असतात. काहीजण तर आपल्या आवडीचे नंबर निवडून ते रजिस्टर करतात. सध्या अशाच काही नंबर प्लेटची किंमत चर्चेचा विषय बनली आहे. त्या नंबर प्लेटची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
तुम्हालाही प्रश्न पडला असेल, असा कोणता नंबर आहे की, ज्याची किंमत इतकी महाग आहे. ‘F1’ असा हा महागडा नंबर आहे. F1 नंबर प्लेटचे वैशिष्ट म्हणजे F1 नंबर हा ‘फॉर्म्युला 1’ चा शॉर्टफॉर्म आहे, त्यामुळे या गाडीच्या नंबर प्लेटची किंमत कोटींच्या घरात आहे.
लंडनमध्ये एका नंबर प्लेटची किंमत तब्बल 90 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. कार कस्टमायझर कंपनीचे मालक अफजल खान यांच्याकडे ही व्हीआयपी नंबर प्लेट असलेली कार आहे. अफजल खान यांनी 10 वर्षापूर्वी हा नंबर 4 कोटी रुपयांना खरेदी केला होता, ज्याची किंमत आता 90 कोटींवर पोहोचली आहे.
माझ्याकडे साठपेक्षा अधिक यूनिक रजिस्ट्रेशन नंबर आहेत. प्रत्येक रजिस्ट्रेशन नंबरची एक वेगळी गोष्ट आहे, त्यामागची कारणंही खास आहेत. – अफजल खान
अफजल खान यांच्या ‘F1’ नंबर प्लेट असलेल्या या गाडीच्या खरेदीसाठी आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले होते. मात्र खान यांनी 90 कोटी रुपयांची ऑफरही धुडकावली आहे.