नवी दिल्ली : बंगलुरूच्या रहिवाशांना रामेश्वरम कॅफेचे ( Rameshwaram Cafe ) नाव ठावूक असेल, रामेश्वरम कॅफे नावावरुनच तुम्हाला कळले असेल की हे एक साऊथ इंडीयन ( South Indian Dishes ) डीशेससाठी प्रसिद्ध कॅफे आहे. येथे सकाळ कॅफे उघडण्याची खवय्ये वाट पहात रांगेत उभे असतात. एका दहा बाय दहा किंवा फार दहा बाय पंधरा चौरस फूट जागेत सुरू केलेल्या साऊथ इंडीयन कॅफेची महिन्याची कमाई फार तर किती असेल ? 20 लाख किंवा 50 लाख नाही तुमचा अंदाज चुकला आहे. या सुपरफास्ट सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या रामेश्वरम कॅफेची महिन्याची कमाई तब्बल 4.5 कोटीच्या घरात आहे. चला तर जाणून घेऊया या ( startup ) स्टार्टअपची जन्मकहाणी काय आहे ती….
बंगलुरूमधील लोकांना रामेश्वरम कॅफे चांगलेच ठावूक आहे, या कॅफेचे शटर उघडण्याची वाट पहात सकाळी खवय्ये रांगेत उभे असतात. या कॅफेमध्ये वाफाळती फिल्टर कॉफी, मसाला डोसे, इडली इतकी प्रसिद्ध आहे की तिची चव आपल्याला येथे वारंवार खेचून आणते. B2B स्टार्टअप उड्डाणचे को- फाऊंडर सुजीत कुमार यांनी झेरोधाचे सीईओ निखिल कामथ यांच्या पॉडकास्टशी बोलताना रामेश्वरम कॅफेची माहीती दिली.
रामेश्वरम कॅफे केवळ दहा बाय दहा किंवा पंधरा स्क्वेअर फूटाच्या जागेत उभे आहे. येथील फूटफॉल प्रचंड मोठा आहे. दिवसाला साडेसात हजार बिल येथे होतात. महिन्याला 4.5 कोटीचा बिझनेस होतो. म्हणजेच वर्षाला 50 कोटीचा गल्ला कुठेच चुकला नाही. आणि त्यांचे मार्जिन एकूण उत्पन्नावर जवळपास 70 टक्के आहे म्हणजे कमाईचा अंदाज आपल्याला येईल असे सुजीत कुमार म्हणतात. कुमार पॉडकास्टच्या तिसऱ्या भागात बोलत होते, त्यांच्या सोबत मिशोचे को-फाऊंडर विदीत अत्रेय आणि फ्युचर ग्रुपचे फाऊंडर किशोर बियानी होते.
रामेश्वरम कॅफे रेस्टॉरंटची स्थापना दिव्य राघवेंद्र राव आणि राघवेंद्र राव यांनी केली आहे. या दोघांना त्यांच्या या उपक्रमासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मस्थानाच्या नावावरून त्यांनी या रेस्टॉरंटला ‘रामेश्वरम’ असे नाव देण्याची प्रेरणा मिळाली. कॅफेमधील सर्व अन्नपदार्थ झटपट ताजे ताजे तयार करुन वाढले जातात.
रामेश्वरम कॅफे सारख्या झटपट सेवा देणार्या रेस्टॉरंटचे सुजीत कुमार यांनी कौतुक करीत अशा क्वीक सर्व्हीस रेस्टॉरंट ‘क्यूएसआर’ रेस्टॉरंट चेननी देशात आपले वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे सांगितले. कुमार यांनी सांगितले की त्यांनी कॉफी चेन थर्ड वेव्ह कॉफी आणि एड-टेक युनिकॉर्न युनाकॅडेमी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
सुजीत कुमार यांनी स्पष्ट केले ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत असताना दिल्ली सोडून बेंगळुरूला परत जाण्यास नाखूष होते. फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल यांनी कुमार यांना त्यांच्या लग्नाच्या बहाण्याने आणि नंतर त्यांच्या ई-कॉमर्स फर्मबद्दल माहीती देण्याच्या बहाण्याने त्यांना बंगळुरू शहरात आमंत्रित केले होते.