मुंबई : काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. सॉफ्टबँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) मसायोशी सोन यांनी सांगितले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्यांची बॅंक स्टार्टअपमध्ये (startup) केवळ एक चतुर्थांश पैसे गुंतवेल. याचे कारण म्हणजे 2021-22 मध्ये सॉफ्टबँकेला विक्रमी 13 अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. मात्र, या निर्णयाने सर्वाधिक फटका बसणार आहे तो भारतीय स्टार्टअप्स यांना. खरं तर, सॉफ्टबँक ही भारतीय टेक स्टार्टअप्समध्ये सर्वात मोठी गुंतवणूकदार आहे. या बॅंकेची भारतात 14 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक आहे.सॉफ्टबँकेचा हा निर्णय म्हणजे भारतीय स्टार्टअप्सवर एक प्रकारे आघात आहे. गेल्या वर्षापर्यंत विकास, निधी, रोजगार आणि युनिकॉर्न बनण्यासाठी कंपन्यांनी हुंकार भरला खरा पण स्टार्टअपची बाजारपेठ सध्या निधी अभावी बेजार झाली आहे. आता निधी आटला आहे, वाढ(Growth) आणि नफ्यावर कठीण ढग आहेत, गुंतवणूकदार (investor) मूल्यांकनावर विश्वास ठेवत नाहीत आणि सूचीबद्ध केलेले स्टार्टअप्सचे शेअर्स उलटे पडून आहेत. पण, असं का घडलं
गेल्या काही वर्षांत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टम बनला आहे. देशात नव उद्यमाला पूरक वातावरण असून, बाजारपेठ 12 ते 15 टक्के वेगाने वाढत आहे. आर्थिक सर्वेक्षण 2021-22 नुसार देशात सध्या 14 हजारांहून अधिक स्टार्टअप असून यामधील काही स्टार्टअप युनिकॉर्न (Unicorn) बनत आहेत.
मे महिन्याच्या सुरुवातीला भारताला निओबँकिंग प्लॅटफॉर्म ओपन म्हणून 100 वे युनिकॉर्न मिळाला आहे. पण, स्टार्टअप्सच्या मार्गातील अवघड टप्पा गेल्या वर्षीपासून सुरू झाला. पहिला आयपीओ आला तो बाजारात आलेल्या स्टार्टअप्सचा. या कंपन्यांच्या मूल्यांकनाबाबतचे दावे निरर्थक ठरू लागले. झोमॅटो, पेटीएम, पॉलिसीबझार सारखे स्टार्टअप्स आजपर्यंत त्यांच्या इश्यू प्राइसपेक्षा धीम्या गतीने कारभार हाकत आहेत.
मूल्यांकनाच्या चिंतेने निधी देणाऱ्यांनी आखडता हात घेतला आहे. यावर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये भारतीय स्टार्टअप्सने 5.8 अब्ज डॉलर्स जमा केले. गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा हे प्रमाण 15 टक्क्यांनी कमी आहे. 2021 मध्ये, भारताच्या टेक स्टार्टअप्सने नवीन निधी म्हणून 35 अब्ज डॉलर्स जमा केले. या स्टार्टअप्समधील कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या मुद्द्यांमुळे ही प्रत्येकजण घाबरला आहे.
युनिकॉर्न, स्टार्ट अप ठरलेल्या कंपन्यांनी काय कामगिरी केली हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यांनी गुंतवणुकदारांचा तपो आणि मनोभंग केला आहे. त्यांनी कष्टाने कमावलेला पैसा एका फटक्यात स्वाहा झाला. फायद्याचे स्वप्न पाहणाऱ्या गुंतवणुकदारांना या कंपन्यांतील गुंतवणुकीतून नफ्याचा मागमूस ही लागला नाही.100 युनिकॉर्नपैकी केवळ 23 जणांनी नफा नोंदवला आहे. त्याचा परिणाम म्हणजे नवीन कंपन्यांचा निधी घट्ट झाला आहे. जेव्हा गोष्टी कठीण झाल्या, तेव्हा स्टार्टअप्समधील कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमावाव्या लागल्या. कार 24 ने आता 600 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. एडटेक वेदांतूने एकट्या मे महिन्यात दोन फेऱ्यांमध्ये 642 जणांना कार्यालया बाहेर काढले असून ही यादी मोठी आहे.
‘अनअॅकॅडमी ग्रुप’ने नुकतेच एक हजार जणांना नारळ दिला आहे. ओलाने 2100 कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे. या वर्षी आतापर्यंत स्टार्टअप्सने 5,700 हून अधिक लोकांना कामावरून काढून टाकले आहे. अहवालात असे म्हटले आहे की आणखी 5,000 हून अधिक लोकांना बाहेर काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो आहे की, भारतीय स्टार्टअप्ससाठी येणारा काळ कठीण आहे का?
याचं उत्तर नक्कीच होय असं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दशकाला टेकेड (Techade) अर्थात तंत्रज्ञान आधारित मानले असून, या दशकात देशात 60 हजार स्टार्टअप येतील, अशी त्यांची अपेक्षा आहे; पण, हे स्टार्टअप मूल्यांकनापासून नफ्यापर्यंत आघाडीवर स्वत:ला मजबूत असल्याचे सिद्ध करतील, तेव्हाच हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल.