मुंबई: कर्जाच्या बोझ्यामुळे डबघाईला आलेल्या व्होडाफोन-आयडिया लिमिटेडला जून तिमाहीत काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण, या तिमाहीत कंपनीला होणाऱ्या तोट्याचे प्रमाण घटले आहे. चालू आर्थिक वर्षातील या पहिल्या तिमाहीत व्होडाफोन-आयडियाला 7,319 कोटींचा तोटा झाला. गेल्यावर्षी याच काळात कंपनीला 25,460 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
काही दिवसांपूर्वीच कुमारमंगलम बिर्ला Vodafone Idea च्या नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन पदावरून पायउतार झाले होते. त्यामुळे ही कंपनी बंद पडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. कुमारमंगलम बिर्ला यांच्या पत्रातील उल्लेखानुसार Vodafone-Idea लिमिटेड कंपनी डबघाईला आली आहे. आता कंपनीचा गाडा हाकणे अवघड असल्याचे बिर्ला यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला Vodafone-Idea लिमिटेडकडे 27 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळेच या कंपनीची सूत्रे सरकार किंवा अन्य कोणाकडे सोपवून कारभार सुरु ठेवण्याचा विचार कुमार मंगलम बिर्ला यांनी बोलून दाखवला होता.
व्होडाफोन आयडियाचे सीईओ रविंदर टक्कर यांनी ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. Vodafone Idea कडून ग्राहकांना उत्तम सेवा आणि चांगले पर्याय देणे सुरुच राहील. गेल्या वर्षभरात ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले. आगामी काळात Vodafone Idea डिजिटल इंडियन आणि डिजिटल भारत या अभियानाच्यादृष्टीने सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान आणि सेवा पुरवण्याचा प्रयत्न करेल, असे रविंदर टक्कर यांनी म्हटले. यावेळी रविंदर टक्कर यांनी कुमारमंगलम बिर्ला यांचा राजीनामा किंवा कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल भाष्य केले नाही. मात्र, त्यांच्या एकंदर प्रतिपादनाचा सूर आश्वासक दिसला.
संबंधित बातम्या:
व्होडाफोन-आयडिया बंद झाल्यास 28 कोटी ग्राहकांचे काय?; ‘या’ 8 मोठ्या बँका होणार प्रभावित
व्होडाफोन आयडिया बुडाली तर सरकारलाही 1.6 लाख कोटींचं नुकसान, जाणून घ्या कसं?