महिन्याला 13 लाख पगार असणाऱ्या व्यक्तीने अब्जाधिशांना फोडला घाम, एका झटक्यात 16 लाख कोटी बुडाले

| Updated on: Dec 19, 2024 | 8:01 PM

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांची संपत्ती 28.4 अब्ज डॉलरने कमी झाली. जेफ बेझोस यांचे 9.72 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत 7.6 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे.

महिन्याला 13 लाख पगार असणाऱ्या व्यक्तीने अब्जाधिशांना फोडला घाम, एका झटक्यात 16 लाख कोटी बुडाले
जरोम पॉवेल
Follow us on

अमेरिकेत बुधवारचा दिवस खूपच महत्वाचा होता. अमेरिकेतील सेंट्रल बँक फेड रिझर्व्हने यावर्षाचे शेवटचे पतधोरण जाहीर केले. यामध्ये सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात केली. तसेच पुढील दोन वर्षांचे नियोजन जगासमोर ठेवले. त्यांचा हा निर्णय शेअर बाजाराने स्वीकारला नाही. त्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. या घसरणीमुळे जगभरातील 500 अब्जाधिशांपैकी जवळपास 400 अब्जाधिशांच्या संपत्तीत घसरण झाली. त्यांचे 193 अब्ज डॉलर म्हणजे 16 लाख कोटी रुपये बुडाले. हा निर्णय घेणारे फेडचे चेअरमन जरोम पॉवेल यांचा महिन्याचा पगार फक्त 13 लाख रुपये आहे.

एलन मस्क यांच्या संपत्तीत सर्वाधिक घसरण

फेडचे चेअमरन असलेल्या जरोम पॉवेल यांच्या एका निर्णयामुळे फक्त शेअर बाजारावरच परिणाम झाला नाही तर जगभरातील अब्जाधिशांमध्ये खळबळ उडाली. पुढील दोन वर्षांचे त्यांनी ठेवलेले नियोजनाने बाजारात त्सुनामी आणली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची संपत्ती 500 अब्ज डॉलरच्या जवळपास होती. त्यांच्या संपत्तीत सर्वाधिक घसरण झाली. जगातील टॉप 25 पैकी 23 जणांची संपत्ती 100 अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमी झाली. म्हणजेच पॉवेल यांच्या निर्णयाचा फटका अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे टॉप 25 पैकी 23 अब्जाधिशांना झाला.

65 अब्जाधीशांची संपत्ती वाढली

‘टीव्ही 9 डिजिटल’च्या बिझनेस टीमने ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या डेटाचे विश्लेषण केले. त्यात बुधवारी अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारातील घसरणीमुळे 500 पैकी 395 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाल्याचे समोर आले. या अब्जाधीशांना 193 अब्ज डॉलर्स म्हणजेच 16.41 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच 65 अब्जाधीशांची संपत्ती वाढल्याचे समोर आले. विशेष बाब म्हणजे 65 अब्जाधीशांपैकी एकाही अब्जाधीशाची संपत्ती एक अब्ज किंवा त्याहून अधिक वाढलेली नाही.

हे सुद्धा वाचा

कोणाचे किती नुकसान

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांची संपत्ती 28.4 अब्ज डॉलरने कमी झाली. जेफ बेझोस यांचे 9.72 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत 7.6 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. कॅनेडियन अब्जाधीश चँगपेंग झोऊ यांचे 6.42 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. मायकेल डेल, लॉरेन्स ग्राफ, लॅरी एलिसन, लॅरी पेज, स्टीव्ह बाल्मर, सर्जी ब्रिन यांनी 6 अब्ज डॉलर आणि 5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले.