मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अंबानी यांनी मनोज मोदी या त्यांच्या मित्राला आणि रिलायन्समधील विश्वासू सहकाऱ्याला 1500 कोटीचं घर गिफ्ट म्हणून दिलं आहे. हे सर्वात मोठं गिफ्ट असल्याचं सांगितलं जातं. आपल्या सहकाऱ्याला एवढं महागडं गिफ्ट मुकेश अंबानी यांनी का दिलं? त्यामागचे कारण काय? असा सवालही या निमित्ताने करण्यात येत आहे. त्याचं उत्तरही समोर आलं आहे.
मनोज मोदी हे रिलायन्स ग्रुपमध्ये धीरूभाई अंबानी यांच्या काळापासून आहेत. ते सध्या रिलायन्स जिओचे डायरेक्टर आहेत. त्यांनी रिलायन्समधील अनेक अवघड जबाबदाऱ्या लिलया पार पाडल्या आहेत. कंपनीची वाढ आणि विस्तार कसा होईल यावर त्यांनी सातत्याने लक्ष दिलं आहे. गेल्या चार दशकापासून रिलायन्सच्या भल्यासाठी ते झटत आहेत. मनोज मोदी हे पडद्याच्या मागे असले तरी त्यांचं रिलायन्सला मोठं करण्यातील योगदान मोठं आहे. रिलायन्सच्या प्रत्येक डीलमध्ये त्यांनी मोठा सहभाग नोंदवला आहे. मुकेश अंबानी यांचाही सर्वात जास्त विश्वास मनोज मोदी यांच्यावरच आहे.
मनोज मोदी यांनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या बळावर रिलायन्सच्या पदरात मोठमोठ्या डील्स पाडल्या आहेत. त्यामुळे रिलायन्सला प्रचंड फायदा झाला आहे. रिलायन्स जिओ आणि फेसबुक दरम्यानची डील हे सर्वात मोठं उदाहरण आहे. एप्रिल 2020मध्ये फेसबुक आणि रिलान्स जिओमध्ये मोठी डील झाली. त्याचं नेतृत्व मनोज मोदी यांनीच केलं होतं. ही 43 हजार कोटींची डील होती. रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जमुक्त करण्यासाठी ही डील मैलाचा दगड ठरली होती.
त्याशिवाय हजिरा पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स, जामनगर रिफायनरी, टेलिकॉम बिझनेस, रिलायन्स रिटेल आणि 4जी रोलआऊट आदी डीलही मनोज मोदी यांनीच घडवून आणल्या होत्या. त्यामुळेच मुकेश अंबानी यांनी मनोज मोदी यांना खूश होऊन हे 1500 कोटींचं घर दिल्याचं सांगितलं जातं. मुकेश अंबानी यांनी जेव्हापासून रिलान्सची सूत्रे हाती घेतली आहेत, तेव्हापासूनच मनोज मोदी यांनीही रिलायन्समध्ये योगदान दिलं आहे. 1980च्या दशकात मनोज मोदी रिलायन्समध्ये आले होते. तर मुकेश अंबानी यांनी 1981मध्ये रिलायन्समध्ये एन्ट्री केली होती.
मनोज मोदी यांची कामाची अत्यंत वेगळी पद्धत आहे. त्यावर त्यांनीच एका कार्यक्रमात भाष्य केलं होतं. मला खरोखरच रणनीती कळत नाही. माझ्याकडे कोणतीही दिव्यदृष्टी नाही. मी माझ्या टीमसोबत चर्चा करतो. त्यांना प्रशिक्षित करतो. त्यांना मार्गदर्शन करतो. कोणतं काम कसं केलं जाऊ शकतं, याबाबत मी सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत असतो, असं ते म्हणाले होते.
रिलायन्सचा सिद्धांत अत्यंत साधा सोपा आहे. जोपर्यंत आमच्यासोबत काम करत असताना प्रत्येकजण पैसा कमवत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे स्थिर बिझनेस राहू शकत नाही, हा रिलायन्सचा सिद्धांत आहे. त्यानुसारच आम्ही काम करत असतो, असं मोदी म्हणाले. जाणकारांच्या मते या सिद्धांतानुसारच मोदी यांना अंबानी यांनी हे 1500 कोटीचं घर दिलं आहे.