नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात दुसऱ्यांदा भूंकप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट झाले. त्यांचा राष्ट्रवादीवर दावा सुरु आहे. राजकारणाची नाडी ओळखणारे शरद पवार यांना घरातूनच आव्हान मिळाले. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकले. पार्टीत उभी फूट पडली. त्यातही अजित पवार (Ajit Pawar) , जास्त संख्याबळाच्या जोरावर दादा ठरले. शरद पवार (Sharad Pawar) गटापेक्षा त्यांच्या बाजूने जास्त आमदार आहेत. राजकारणात काकाला धोबीपछाड देण्याच्या तयारीत ते आहेत. राजकीय भूकंपानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या कोण पॉवरफुल आहे, यावरुन चर्चा रंगली आहे. राजकीय अनुभव पणाला लागला आहे. पण संपत्तीत कोण दादा आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पदी
अजित पवार पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीतील दोन तृतीयांश आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा त्यांचा दावा आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादीवर मजबूत पकड दिसत आहे. तशी दादांची प्रशासनावर पण मजबूत पकड आहे. राज्यातील राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्यांच्या कामाची कार्यपद्धती, वक्तशीरपणा, काटेकोरपणा, शब्द दिला तर काम करुन घेण्याची हतोटी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. अजित पवार यांना राजकारणाचं गणित चागलं माहिती आहे.
शरद पवार यांची संपत्ती
या दोन्ही नेते धनकुबेर आहेत. त्यांच्याकडे अफाट संपत्ती असल्याचा दावा करण्यात येतो. निवडणूक प्रतिज्ञापत्रात मात्र त्यांच्या संपत्तीचा आकाडा दाव्यांपेक्षा वेगळा आहे. शरद पवार यांनी 2020 मध्ये राज्यसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे केवळ 32.73 कोटी रुपयांची संपत्ती आहे. वर्ष 2014 पेक्षा 2020 मध्ये त्यांच्या संपत्तीत केवळ 60 लाख रुपयांची वाढ झाली. 32.73 कोटी संपत्तीत त्यांच्याकडे 25.21 कोटी चल आणि 7.72 कोटींची अचल संपत्ती आहे.
अजित पवार यांची संपत्ती किती
अजित पवार यांनी 2019 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा तपशील दिला आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे एकूण
75.48 कोटी रुपयांची चल-अचल संपत्ती आहे. काकांपेक्षा त्यांच्याकडे अधिक संपत्ती आहे. ते खऱ्या अर्थाने दादा ठरले आहेत. त्यांच्याकडे 23.75 कोटी रुपयांची चल आणि 51.75 कोटींची अचल संपत्ती आहे.
संपत्तीचा तपशील
अजित पवार यांच्याकडे 75.48 कोटी रुपयांची चल-अचल संपत्ती आहे. त्यापैकी त्यांच्या कुटुंबाकडे 2.65 कोटी रुपयांची शेतजमीन, 16.45 लाख रुपयांची बिगर शेती जमीन आणि 21.78 कोटी रुपयांचे निवासी घर, 10.85 कोटी रुपयांची व्यावसायिक मालमत्ता आहे. 2019 मधील प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्यावर जवळपास 3.73 कोटी रुपयांचे कर्ज आहे.