नवी दिल्ली : अनिल धीरूभाई अंबानी (Anil Ambani) ग्रुपचा भाग असलेल्या ‘रिलायन्स कॅपिटल कंपनी’ (Reliance Capital) दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली आहे. या कंपनीवर प्रचंड कर्ज आहे. त्यानंतरही या कंपनीच्या शेअरमध्ये मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून सतत अप्पर सर्किट लागत आहे. कंपनीचा शेअर सोमवारी अप्पर सर्किटवर होता. त्यानंतर मंगळवारी शेअर बाजाराच्या सत्रास सुरुवात होताच किंमतीत पाच टक्के वाढ झाली. ११.८० रुपयांवर हा शेअर पोहचला.
अनिल अंबानींच्या मालकीची ‘रिलायन्स कॅपिटल’ ही कर्जबाजारी कंपनी आहे. ही कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. या कंपनीची १० जानेवारी रोजी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अधिग्रहणासंदर्भात निर्णय होणार आहे. या कंपनीस टोरेंट ग्रुप आणि हिंदुजा ग्लोबल यांच्याकडून कंपनीचे अधिग्रहण केले जाणार असल्याच्या बातम्या सध्या बाजारात पसरल्या आहे. त्यामुळे हा स्टॉक चांगलाच ॲक्टिव झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्समध्ये 30 टक्के घसरण झाली होती. त्याच वेळी YTD आधारे शेअरची किंमत 21 टक्के वाढली आहे.
काय आहे शेअरचा इतिहास :
रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरची किंमत मंगळवारी ११.८० रुपयांवर पोहचली. या कंपनीच्या शेअर्सनी २०२३ च्या सुरुवातीपासून सतत 5 ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटवर सातत्याने धडक दिली आहे. यापुर्वी ५ जानेवारी २०१८ रोजी या कंपनीचे शेअर्स ६०० रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्यानंतर शेअरमध्ये पडझड सुरू होऊन शेअर्स सध्या १२ रुपयांवर आला आहे.
भारतीय रिर्झव्ह बँकेचा निर्णय :
मागील वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये भारतीय रिर्झव्ह बँकेने (RBI) रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या संचालक मंडळाला बरखास्त केले होते. तसेच प्रशासक म्हणून ‘नागेश्वर राव वाय’ यांना नियुक्त केली होती.
रिलायन्स कॅपिटल दिवाळखोरी प्रकरण :
टोरेंट उद्योग समूहाच्या याचिकेवर NCLT ने रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या दिवाळखोरीच्या कार्यवाहीला स्थगिती दिली.या कंपनीने ई-लिलाव प्रक्रियेत टोरेंट उद्योग समूहने 8,640 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती. तर हिंदुजा उद्योग समूहाने 8,110 कोटी रुपये बोली लावली होती. मात्र ई-लिलावाच्या दुसऱ्या दिवशीच लगेच हिंदुजा उद्योग समूहाने आपली ऑफर 9000 कोटी रुपये जाहीर केली. ई-लिलावानंतर हिंदुजा उद्योग समूहाने बोली वाढवलीॉ. ही ऑफर चुकीची आणि बेकायदेशीर आहे, असे टोरेंट उद्योग समूहाने आपल्या दाखल केलेल्या याचिकेत म्हंटले आहे. NCLT ने RCL कंपनीच्या प्रशासकाला टोरेंट उद्योग ग्रुपच्या अर्जाला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात केली जाणार आहे.