प्रत्येकाला नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करायची इच्छा असते. पण सुरुवात कुठून करावी हेच उमजत नाही. व्यवसाय करायला मोठं भांडवलं लागतं असा अनेकांचा गैरसमज आहे. पैसा लावल्यानंतर जर व्यवसाय चालला नाही तर काय होईल अशी भीती देखील अनेकांच्या मनात असते. त्यामुळेच अनेक जण व्यवसायात उतरण्याआधीच माघार घेतात. पण भारतात एका व्यक्तीने वयाच्या ४२ व्या वर्षी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनात त्यांना काय करायचं आहे हे स्पष्ट होतं. शेअर मार्केटमध्ये नफा कमवल्यानंतर हा व्यक्ती अचानक शेअर मार्केटमधून गायब झाला. लोकांनी त्याला वेड्यात काढलं. पण या व्यक्तीने तो कसा बरोबर होता हे आज सिद्ध केलंय. कोरोना काळात जेथे अनेक कंपन्यांना टाळं लागलं. अंबानी, अदानी यांना देखील मोठं नुकसान सहन करावं लागलं. पण याच काळात या कंपनीने चांगला नफा कमवला.
डी मार्ट असं या कंपनीचं नाव आहे जेथे लोकं आता दर महिन्याला घरात लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी जातात. डीमार्ट मध्ये आल्यावर कोणाला ही मॉल मध्ये आल्याची फिलिंग नसते. पण सर्वसामान्यांच्या मनात एक प्रेस्टीज भावना देखील असते. इथे फक्त फरक आहे तो घराजवळील किराणा दुकान आणि एकाच ठिकाणी मिळणाऱ्या सगळ्या वस्तूंचं दुकान. ज्या फक्त एसी मध्ये ठेवलेल्या असतात इतकंच. सर्वसामान्य व्यक्तीपासून ते उच्च मध्यमवर्गीय लोकं येथे खरेदी करण्यासाठी येतात. अशी कोणतीच वस्तू नसते जी डीमार्ट मध्ये आल्यावर तुम्हाला मिळत नाही. कंपनी प्रत्येक सीजननुसार लागणाऱ्या वस्तू विक्रीसाठी ठेवते. इथे तुम्हाला दिवाळीला लागणारे दिव्या पासून होळीला लागणाऱ्या पिचकारी पर्यंत, पावसाळ्यात लागणाऱ्या छत्री पासून थंडी लागणाऱ्या स्वटेरपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात. अगदी लोकल ते ग्लोबल अशा वस्तू तुम्हाला डीमार्टमध्ये खरेदी करायला मिळतात. डीमार्टने काही वर्षातच अनेक मोठ्या कंपन्यांना मागे टाकलंय. त्याचं एकमेव कारण म्हणजे डीमार्टचे असलेले बिझनेस मॉडल.
रिटेल स्टोअर डी-मार्टचे संचालन करणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचा नफा जानेवारी २०२३ च्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 17 टक्क्यांनी वाढून 690.41 कोटी रुपये झाला आहे. डीमार्टची कमाई वाढतच चालली आहे. डीमार्टचं कन्सेप्ट ज्यांनी आणलं ते राधाकिशन दमानी यांची संपत्ती आता मागील वर्ष 2023 च्या तुलनेत 5.92 अब्ज डॉलर्सने वाढ झाली, जेव्हा त्यांची एकूण संपत्ती 15.30 अब्ज डॉलर होती.
डीमार्ट स्टोअरची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे सर्वात कमी किमतीत वस्तू उपलब्ध आहेत. असं असून सुद्धा राधाकिशन दमानी यांची ही कंपनी नेहमीच नफा कशी कमावते. असा प्रश्न अनेकांना पडतो. डी-मार्ट स्टोअरचे बिझनेस मॉडेल काय आहे. सविस्तर जाणून घेऊयात.
D-Mart चे बिझनेस मॉडेल हे रिटेल स्टोअर कंपन्यांपेक्षा बरेच वेगळे आहे.
1- स्लॉट/स्पेस फी
डीमार्ट मध्ये तुम्ही गेलात तर तिथे अनेक कंपन्यांचे प्रोडक्ट तुम्हाला पाहायला मिळतात. डीमार्ट मध्ये प्रवेश करताच काही कंपन्यांच्या वस्तू तुम्हाला प्रीमियम स्पेसमध्ये ठेवलेल्या दिसतात. या प्रीमियस स्पेसमध्ये आपल्या कंपनीच्या वस्तू असाव्यात यासाठी कंपन्या डीमार्टला पैसे देतात. अशा प्रकारे डीमार्टला पहिला नफा या माध्यमातून मिळतो.
2- भाडे द्यावे लागत नाही
बरीच दुकाने किंवा कंपन्यांचे आऊटलेट किंवा मॉल्समध्ये असलेले स्टोअर्स हे भाड्याच्या जागेवर असतात. पण डीमार्टचे मॉडेल पूर्णपणे याच्या विरोधात आहे. डी-मार्ट स्टोअर्स हे शहरात नसतात. ते शहरापासून थोडे लांब असतात. याचे कारण म्हणजे डीमार्ट नेहमीच जागा खरेदी करुनच त्या ठिकाणी दुकान उघडते. त्यामुळे भाड्याला जाणारे पैसे वाचतात. कारण भाडं हे एकूण खर्चाच्या 5-10 टक्के असते. हे पैसे देखील D-Mart चे वाचतात आणि त्यांना याचाही फायदा होतो. जागेची किंमत ही वाढतच असते. त्यामुळे भविष्यात जर जागा विकावी लागली तरी त्याचा चांगला परतावा मिळतो.
3- पार्किंग व्यवस्थेवर खर्च नाही
तुम्ही जेव्हा डी-मार्ट स्टोअरला खरेदी करायला जाल तेव्हा शक्यतो आता ते शहरापासून लांब असल्याचं पार्किंगची व्यवस्था असते. पण जे आऊटलेट हे शहराच्या जवळ आहे तेथे मात्र डीमार्ट कडून कोणतीही पार्किंग व्यवस्था केलेले नसते. कारण कंपनी पार्किंगसाठी मुद्दाम पैसे खर्च करत नाही. यामुळे खर्चात वाढ होऊ शकते. शहरापासून दूर D-Mart असल्यास तेथे गर्दी नसल्यामुळे गाडी पार्क करायला मिळते.
4- इंटीरियरसाठी खर्च नाही
डी-मार्ट स्टोअरमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तिथे तुम्हाला कोणताही इंटीरियरचा खर्च केलेला दिसत नाही. एखाद्या दुकानात आल्यासारखेच तुम्हाला वाटते. तेथे तुम्हाला लिफ्टच्या आजूबाजूला देखील वस्तू ठेवलेल्या दिसतात. संपूर्ण मजल्यावर भरपूर सामान दिसते. कुठलीच जागा अशी रिकामी नसते. दुकानाच्या आत सजावटी अजिबात नसते. त्याऐवजी सामान ठेवण्यावर भर दिला जातो. कंपनी इंटिरियरवर जास्त खर्च करत नाही आणि भरपूर ऍक्सेसरीज ठेवून जागेचा जास्तीत जास्त वापर करते.
5- स्वस्त, मजबूत पुरवठादार
डी-मार्ट आपल्या पुरवठादारांकडून अत्यंत स्वस्त किमतीत वस्तू खरेदी करते. इतर दुकानांमध्ये तुम्ही जर पाहिले तर त्यांचा क्रेडिट काळ हा ३० ते ४५ दिवसांचा असतो. पण डीमार्ट मध्ये तसं नसतं. डीमार्ट मधल्या वस्तू खूप लवकर विकल्या जातात. त्यामुळे पुरवठा करणाऱ्यांना 8-10 दिवसात त्यांचे पैसे मिळतात. याचा अर्थ असा की पुरवठादाराला 10 दिवसांच्या आत विकलेल्या उत्पादनाचे पैसे मिळतात, ज्यामुळे तो काही अतिरिक्त सवलतीवर उत्पादन देतो.
6- मध्यस्थ कोणी नाही
डी-मार्ट हे थेट उत्पादकांकडून वस्तू खरेदी करतात. ज्यामुळे त्यांना अत्यंत स्वस्त किमतीत वस्तू मिळवतात. कोणी मध्यस्थ व्यक्ती नसल्याने त्यांचा नफा वाढतो. मध्यस्थांना द्यावे लागणारे कमिशन डी-मार्टला मिळते. अशा प्रकारे, डी-मार्टमध्ये मिळणाऱ्या वस्तूंची किंमत खूप कमी ठेवते. ज्याचा ग्राहकांना देखील फायदा होतो.
7- कमी मार्जिनवर अधिक मालाची विक्री
कोणत्याही वस्तू तुम्ही खरेदी करा. त्या डी-मार्टमध्ये अतिशय स्वस्त दरात उपलब्ध असतात. डी-मार्ट उत्पादनांची विक्री अगदी कमी मार्जिनवर करते, ज्यामुळे ग्राहकांना देखील ती कमी किंमतीत मिळते. स्वस्त उत्पादन मिळत असल्यामुळेच लोकं या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येतात. डीमार्टचा कायमचा ग्राहक बनतो. यामुळे डी-मार्ट कमी मार्जिन असूनही चांगली कमाई करतो. दुसरं म्हणजे लोकं एकाच वेळी जास्त सामना खरेदी करुन घेऊन जातात. याचा देखील डीमार्टला फायदा होतो.
8- उत्पादन श्रेणीत कमी उत्पादने
डी-मार्ट विविध कंपन्यांचे उत्पादन ठेवते. पण त्यांची श्रेणी ही जास्त नसते. दहा रुपयाचे विम साबन किंवा मग डायरेक्ट २५ रुपयांचे विम साबन ठेवला जातो. पाच रुपये किंवा जास्त किंमतीत ठेवले जात नाही. असे केल्याने त्यांना जास्त साठा करुन ठेवायची गरज भासत नाहीत. वेगवेगळ्या कंपन्यांचे जास्त उत्पादने ठेवली तर त्यांना सूट पण कमी मिळते.
9- स्वतःची ब्रँडिंग
डी-मार्टच्या स्टोअरमध्ये गेल्यावर तुम्ही पाहिले असेल की याठिकाणी विविध कंपन्यांच्या वस्तू असतात. पण यासोबतच डीमार्ट त्यांच्या नावाने देखील काही वस्तू विकते. डीमार्ट यातून स्वतःचे ब्रँडिंग तर करतेच पण इतर ब्रँडच्या तुलनेत कमी किंमतीत वस्तू खरेदी करण्याची संधी ग्राहकांना देत. ज्यामध्ये किराणा मालापासून ते कपडे आणि स्वयंपाकघरातील उत्पादनांचा समावेश आहे. DMart Premia, DHomes, Dutch Harbor इत्यादी ब्रँड नावांनी वस्तू विकल्या जातात. डी-मार्ट त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते आणि नंतर ते स्वतःच्या ब्रँड नावाने विकते.
10- स्वस्त किराणा सामान देऊन नफा
डी-मार्टमध्ये जाणारे बहुतेक लोकं हे बहुतेक स्वस्त किराणा सामान घेण्यासाठीच जात असतात. इतर ब्रँडेड वस्तूंवर कमी सवलत असते. पण डिमार्ट वस्तूंवर अधिक सूट दिली जाते. डी-मार्ट केवळ किराणा मालाचीच विक्री करत असताना कपडे, पादत्राणे, प्लास्टिकच्या वस्तू या सारख्या वस्तू देखील विकते.
दमाणी यांनी 2002 मध्ये मुंबईत डीमार्टचे पहिले स्टोअर उघडले होते. त्या स्टोर पासून ते शेअर मार्केटमध्ये अग्रेसर कंपनी पर्यंतचा त्यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. इतर कंपन्यांप्रमाणे दमाणी यांनी घाई करत इतर शहरात पटापट स्टोअर्स न उघडता हळूहळू कासवाच्या गतीने हा प्रवास सुरु ठेवला. आज DMart चे देशात 300 हून अधिक स्टोअर्स आहेत. आतापर्यंत फक्त ११ राज्यांमध्येच त्यांनी डीमार्ट सुरु केले आहे. त्यामुळे भविष्यात आणखी स्टोअर्स उघडतील ज्याचा फायदा कंपनीला होत राहिल.