भारतीयांनी जगभरात आपला यशाचा झेंडा रोवला आहे. अमेरिकेतील अनेक कंपन्यांमध्ये सर्वोच्च पद भारतीयांकडे आले आहे. भारतवंशी सीईओ सुंदर पिचाई, आयबीएममधील अरविंद कृष्णा, नेटवर्क्सचे सीईओ निकेश अरोडा असे अनेकांनी अमेरिकेत आपल्या बुद्धमत्तेच्या जोरावर सर्वोच्च पद मिळवले आहे. काही वर्षांपूर्वी टि्वटर म्हणजे एक्सची सूत्रही भारतीय व्यक्तीकडे होती. त्यावेळी त्या कंपनीत असलेल्या भारतीय सीईओचे पॅकेज 100 कोटी होते. परंतु एलन मस्क यांनी एक्सची सूत्र घेताच त्यांना कंपनीतून काढून टाकले. परंतु नोकरी गेल्यानंतर त्या व्यक्तीने हिंमत हारली नाही. आज ते स्वत:ची कंपनी चालवत आहे. ती व्यक्ती म्हणजे पराग अग्रवाल होय.
ऑक्टोबर 2022 मध्ये एलोन मस्क यांनी ट्विटर $44 अब्जांना विकत घेतले. एलोन मस्क यांनी ट्विटर घेतल्यानंतर त्यात अनेक मोठे बदल करण्यात आले. इलॉन मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स केले. अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्यात तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांचाही समावेश होता.
आयआयटीमध्ये शिक्षण झालेले पराग अग्रवाल हे ट्विटरचे सीईओ म्हणून खूप लोकप्रिय झाले होते. ट्विटरचे सीईओ म्हणून काम करताना त्यांचे पॅकेज 100 कोटी रुपयांपर्यंत गेले होते. ब्लूमबर्गच्या कर्ट वॅगनरच्या पुस्तकानुसार, पराग अग्रवाल यांनी एलोन मस्कच्या खाजगी जेटचे लोकेशन ट्रॅक करणारे अकाउंट ब्लॉक करण्याची विनंती नाकारली होती. ट्विटरच्या अधिग्रहणपूर्वीची ही घटना होती. त्यामुळे ट्विटर घेतल्यानंतर एलन मस्क यांनी पराग अग्रवाल यांना नोकरीवरुन काढून टाकले. कामावरून काढून टाकल्यानंतर पराग अग्रवाल 400 कोटी रुपये घेण्यास पात्र होते. परंतु त्यांना कोणतीही रक्कम दिली नाही. पराग अग्रवाल आणि ट्विटरच्या इतर कर्मचाऱ्यांनी एलन मस्कविरोधात खटला दाखल केला. एकूण 1000 कोटी रुपयांच्या नुकसानची मागणी त्यांनी त्या खटल्यात केली.
पराग अग्रवाल ट्विटरमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेक्टरमध्ये काम सुरु केले. त्याच्या नवीन प्रोजेक्टसाठी ₹249 कोटींचा निधी मिळाला आहे. त्याचे स्टार्टअप ओपन एआयच्या चॅटजीपीटीमागील तंत्रज्ञानाप्रमाणे आहे. त्यांनी मोठ्या भाषेच्या मॉडेल्सचे सॉफ्टवेअर विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.