नवी दिल्ली | 31 ऑक्टोबर 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना अवघ्या चार दिवसांतच तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आता 400 कोटींच्या खंडणीसाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यापूर्वी शनिवारी त्यांना 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ही रक्कम 200 कोटी रुपये करण्यात आली. आता तिसऱ्या ई-मेलमध्ये ही रक्कम 400 कोटी रुपये इतकी वाढविण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुकेश अंबानी यांना व्हीआयपी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. कोणती आहे ही सुरक्षा व्यवस्था?
जगभरात सुरक्षा
यावर्षीच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यासाठी आदेश दिला होता. त्यानुसार मुकेश अंबानी यांना Z+ दर्जाची सुरक्षा देण्याचे निर्देश देण्यात आले. ही सुरक्षा व्यवस्था देशातच नाही तर परदेशात पण उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुरक्षेचा खर्च अंबानी कुटुंबाला करायचा आहे.
कोणा-कोणाला मिळते सुरक्षा?
देशात केंद्र सरकार काही लोकांना सुरक्षा व्यवस्था पुरवते. ज्या लोकांच्या जीवाला धोका आहे. देशातील महत्वाच्या पदावरील व्यक्तींना ही सुरक्षा पुरवण्यात येते. सुरक्षा संस्था अशा व्यक्तीच्या जीविताला धोका असल्याचे लक्षात घेऊन सुरक्षा पुरविते. देशात पाच प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे. यामध्ये Z+, Z, Y+, Y आणि X दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे.