नवी दिल्ली : जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये कॉस्ट कटींग केले जात आहे. त्याचवेळी एअर इंडियाने 470 विमान खरेदी करण्याचा जगातील सर्वात मोठा करार केला आहे. या करारानंतर एअर इंडियाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी एअर इंडिया लवकरच पायलट (Pilot) आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. बिजनेस टुडेने दिलेल्या बातमीनुसार, एअर इंडियामध्ये काही जागांसाठी तब्बल दोन कोटींचे पॅकेज दिले जाणार आहे. एअर इंडिया B777 विमानासाठी पायलटची भरती करणार आहे. त्यासाठी वार्षिक दोन कोटींचे पॅकेज दिले जाणार आहे. अनुभवी पायलटेसाठी ही चांगली संधी असणार आहे.
काय असणार पॅकेज
अनुभवी पायलटला १७ लाखांपेक्षा जास्त पगार एअर इंडिया देणार आहे. १७ लाख ३९ हजार ११८ रुपये वेतन दर महिन्याला पायलटला देण्यात येणार आहे. हवाई क्षेत्रात चांगल्या पायलटांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. यामुळे चांगले पॅकेज देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान केले जाणार आहे. यासाठी पाच हजार ते सात हजार तास विमान उड्डान करण्याचा अनुभव आवश्यक असणार आहे. एअर इंडियात केबिन क्रू आणि ग्राऊंड स्टाफ, सिक्योरिटी आणि अन्य तांत्रिक पोस्टसाठीही भरती केली जाणार आहे.
एअर इंडियाने नुकतीच विमान खरेदीची मोठी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरनुसार आता येत्या दशकात एअरबस आणि बोइंगकडून 470 विमान खरेदी करण्यात येतील. तसेच यामध्ये 370 विमान खरेदीचा पर्याय ही समोर आहे.
टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण केले. त्यानंतर एअर इंडियाच्या विस्ताराची मोठी योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी 840 विमानांच्या खरेदीची ऑर्डर देण्यात आली आहे. यामध्ये 370 विमान खरेदीचा पर्याय ही समोर आहे. आतापर्यंत एखाद्या विमान कंपनीने दिलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. सध्या एअर इंडियाकडे 113 विमान आहेत. सध्या कंपनीकडे 1,600 पायलट आहेत.
किती असणार गरज
एअर इंडियाला प्रति विमान 30 पायलट लागतील. ए350 या विमानासाठी 1,200 पायलटची गरज आहे. बोइंग 777 साठी 26 पायलट लागतील. अशा 10 विमानांचा समावेश केल्यास 260 पायलट लागतील. 20 बोइंग 787 विमानांसाठी 400 पायलटची गरज आहे. अजून इतर विमानांचा विचार करता कमीत कमी 4,800 पायलटची गरज भासेल.