रेल्वेत बंपर भरती! या झोनमध्ये भरली जाणार ALP च्या हजारो पदे

| Updated on: Apr 01, 2025 | 4:52 PM

नोकरी मिळवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या हजारो तरुणांसाठी भारतीय रेल्वेने एक सुवर्णसंधी प्रस्तुत केली आहे.विविध पदांवर काम करण्याची ही संधी तुम्ही गमावू नका! अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेची पूर्ण माहिती वाचा.

रेल्वेत बंपर भरती! या झोनमध्ये भरली जाणार ALP च्या हजारो पदे
Follow us on

सध्या राज्यात आणि देशात नोकरीची मोठी कमतरता आहे, ज्यामुळे योग्य नोकरी मिळवण्यासाठी लाखो लोक दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेने बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वे भरती मंडळ (आरआरबी) लवकरच सहायक लोको पायलट (एएलपी) पदांसाठी ९,००० हून अधिक जागांसाठी अधिसूचना जारी करणार आहे.

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून अनेक तरुणांना भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया १० एप्रिल २०२५ पासून ऑनलाइन सुरू होण्याची शक्यता आहे, आणि उमेदवारांना ९ एप्रिल २०२५ पर्यंत अधिकृत अधि सूचना प्राप्त होईल, असे समजले जात आहे.

भारतीय रेल्वेने सहायक लोको पायलट (एएलपी) पदांसाठी ९,९७० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये पूर्व किनारा रेल्वेत १,४६१, उत्तर पश्चिम रेल्वेत ६७९, दक्षिण मध्य रेल्वेत ९८९, पश्चिम रेल्वेत ८८५, आणि मेट्रो रेल्वे कोलकाता येथे २२५ पदांचा समावेश आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना चार टप्प्यांच्या निवड प्रक्रियेतून जावे लागेल. या टप्प्यांमध्ये संगणक आधारित चाचणी (सीबीटी १ आणि सीबीटी २), संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (सीबीएटी), कागदपत्र पडताळणी, आणि वैद्यकीय चाचणी यांचा समावेश आहे.

अधिसूचनेनुसार, उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. आरआरबी एएलपी भरती २०२५ साठी अर्ज शुल्क श्रेणीनुसार वेगवेगळे ठरवण्यात आले आहे. जनरल/ओबीसी वर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागेल, तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला/अल्पसंख्याक उमेदवारांना २५० रुपये शुल्क आकारले जाईल.

भारतीय रेल्वे, जी देशातील सर्वात मोठी नोकरी देणारी संस्था मानली जाते, या भरतीमुळे हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. सहायक लोको पायलट पद रेल्वेच्या परिचालनातील महत्त्वाची भूमिका असून, या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार आणि इतर सुविधांचा लाभ मिळेल. रेल्वे प्रशासनाने उमेदवारांना वेळेत अर्ज करून या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.