मुंबई : भरपूर पगार आणि मोठ्या प्रतिष्ठेची नोकरी मिळावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अनेकजण हे ध्येय गाठतातही. मात्र, फक्त पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे न लागता आत्मसमाधानासाठी नोकरी करणारेसुद्धा अनेकजण आपल्या देशात आहेत. अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी (GATE 2021 Exam) परीक्षेत देशात पहिला आलेले सिद्धार्थ सभारवाल (Siddharth Sabhaarwal) हेसुद्धा त्याचेच एक उदाहरण आहेत. (GATE topper Siddharth Sabhaarwal left the IES job for teaching student)
सिद्धार्थ सभरवाल GATE परीक्षेत प्रथम
सिद्धार्थ सभारवाल हे मूळचे उत्तरप्रदेश राज्यातील अलीगढ येथील आहेत. अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी (GATE 2021 Exam) परीक्षेचा निकाल 19 मार्च रोजी जाहीर झाला. या परीक्षेत सभारवाल हे देशातून पहिले आहे. या निर्भेळ यशामुळे देशभरातून त्यांचे कौतूक होत आहे. सभारवाल यांना 100 पैकी 82 गुण मिळाले आहेत. या परीक्षेत प्रथम आल्यामुळे सभारवाल वाल यांना पुढील शिक्षणासाठी देशातीली कोणतेही अभियांत्रिकी कॉलेज सहज मिळेल. पण ते कोणत्याही कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जाणार नाहीत. ते इतर विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. विद्यार्थ्यांना शिवकण्यासाठी त्यांनी आयईएसची नोकरी सोडून दिली आहे.
सभारवाल यांनी यापूर्वीसुद्धा दोन वेळा GATE परीक्षा उत्तम रँकसह उत्तीर्ण केलेली आहे. 2012 साली त्यांना गेट परीक्षेत 61 वा रँक मिळाला होता. तर 2013 साली ते देशातून 31 व्या स्थानी होते. त्यानंतर यावेळी ते देशातून थेट पहिले आले आहेत.
सभारवाल यांनी आयआयटी दिल्ली येथून त्यांची अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली आहे. त्यांतर त्यांनी भारतीय अभियांत्रिकी सेवा ( Indian Engineering Services (IES)) परीक्षा 2015 मध्ये उत्तीर्ण केली. एकूण तीन वर्षे म्हणजेच 2018 पर्यंत त्यांनी IES म्हणून सरकारी नोकरी केली. मात्र, विद्यार्थ्यांना शिकवण्याची ओढ असल्यामुळे त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. सध्या ते अनअकॅडमी (Unacademy) या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या अभियांत्रिकी प्रवेश प्ररीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतात.
उच्च पगार आणि प्रतिष्ठित अशी सरकारी नोकरी सोडूत सभारवाल विद्यार्थ्यांना शिकवतात. एवढंच नाही, तर वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतील नवे प्रवाह, प्रश्न विचारण्याच्या नव्या पद्धती समजाव्यात म्हणून ते स्वत: आजही अनेक प्रवेश परीक्षा देतात. या परीक्षांमधून मला अनुभव मिळतो. तसेच एका शिक्षकांने विद्यार्थ्यांना आणखी काय शिकवायला हवे तेही मला समजते, असे ते सांगतात.
दरम्यान, सिद्धार्थ सभारवाल यांनी गेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. शेवटच्या दोन ते तीन महिन्यांत त्यांनी मॉक टेस्ट दिल्या होत्या. तसेच गेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केल्याचं ते सांगतात. त्यांच्या या निर्भेळ यशाची कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.
इतर बातम्या :
(GATE topper Siddharth Sabhaarwal left the IES job for teaching student)