नवी दिल्ली : सरकारी बँक मॅनेजर (Bank Manager) बनायचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. ‘बँक ऑफ बडोदा’ (Bank Of Baroda)कडून १५९ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा आणि बिहार सोबतच अन्य राज्यांमध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखांसाठी घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी २३ ते २५ वयोगटातील पदवीधर (Graduate) ‘बँक ऑफ बडोदा’च्या अधिकृत वेबसाईटवर bankofbaroda.in जाऊन १४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
बँक ऑफ बडोदामध्ये ब्रान्च मॅनेजरच्या पदासाठी एकूण १५९ पदांपैकी खुल्या प्रवर्गासाठी ६८ जागा, अनुसूचित जातीसाठी २३ जागा, अनुसूचित जमातीसाठी ११ जागा, इतर मागास वर्गासाठी ४२ जागा आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या उमेदवारांसाठी १५ जागा आहेत.
बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरपदासाठी अर्ज करताना उमेदवाराकडे कुठल्याही विषयातील पदवी असणं आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे कमीत कमी २ वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील २३ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कमाल वयाची अट नाही.
जनरल, OBC, EWS प्रवर्गातील उमेदवारांकडून ६०० रुपये अर्जाची फी आकारण्यात येईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती उमेदवार त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी १०० रुपये अर्जाची फी आकारण्यात येईल.