सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आणि राज्यात तब्बल 7 हजार पदांची पोलीस भरती होणार असल्याची बातमी आली. या बातमीने युवकांना मोठा दिलासा मिळाला. आता आणखी एक अशीच आनंदाची बातमी (Good News) समोर आलीये. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात घोषित झालेली 60 हजार पदांची मेगाभरती (Mega Bharati) अजूनही झालेली नाही. त्यामुळे बेरोजगार तरुण-तरुणींमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने पदभरतीवरील सर्व निर्बंध उठविले असून आता सर्व विभागांनी त्यांच्याकडील मंजूर व रिक्तपदांच्या आकृतीबंधास मान्यता घेऊन पदभरती (Recruitment) सुरु करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.
सद्यस्थितीत सरकारच्या 34 प्रमुख विभागांमध्ये दोन लाखांवर पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांच्या 50 टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात किमान लाखभर पदांसाठी मेगाभरतीची प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारी विभागांमध्ये मागील सहा वर्षांत मोठी पदभरती झालेली नाही. आता राज्याच्या गृह विभागात जवळपास 18 हजार, जलसंपदा विभागात 15 हजार, पशुसंवर्धन, कृषी, मराठी राजभाषा विभाग, महसूल, भूमीअभिलेख, पुरवठा विभाग, शिक्षण अशा विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या वाढली आहे.
दरम्यान राज्यात लवकरच तब्बल 7 हजार पदांची पोलीस भरती निघणार आहे. कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. तसेच पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण गेल्या काही महिन्यांपासून मैदानात घाम गाळत आहेत. त्यांना त्यांच्या घामाचं सोनं करण्याची संधी देणारी ही भरती असणार आहे. ही भरती प्रक्रिया ही केवळ पोलीस कॉन्टेबल या पदासाठी पार पडणार आहे. एक ते दीड महिन्यात ही भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्य सरकार आणखी एका मोठ्या भरतीच्या तयारीत असल्याची माहितीही विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वीच पाच हजार पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आता हा दुसरा टप्पा हा सात हजारांचा असणार आहे. तर तिसरा टप्पा हा दहा हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी पुढील काही दिवस हे चांगले असणार आहेत. त्यांना भरतीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.