पुणे: कमाल! राज्यात 122 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवलेले आहेत. दहावीचा निकाल (SSC Results 2022) विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता उपलब्ध होणार आहे. निकालासंदर्भात बोर्डाची पत्रकार परिषद (Press Conference) घेण्यात आली त्यात यासंदर्भातली सविस्तर माहिती देण्यात आलीये. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही (10th Results) कोकण विभाग अव्वल आहे! कोविडमुळे विद्यार्थी आणि पालक दोन्हींचे हाल झाले. परीक्षा होणार नाही होणार इथून सुरुवात होती पण तरीही राज्यातल्या एकूण 122 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवणं ही अभिमानास्पद बाब आहे. शिवाय 82 हजार 60 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के गुण मिळालेले आहेत.
यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागलेला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के लागेलेला आहे. कोविडमुळे 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. यूपीएससी, बारावी आणि आता दहावी! दहावीच्या परीक्षेत सुद्धा मुलींनीच बाजी मारलेली आहे. राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागलाय. त्याचबरोबर राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून 8 हजार 169 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 8 हजार 29 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 7 हजार 579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th
दरम्यान या सगळ्या घडामोडीत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतीये. पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे. बारावीची आणि दहावीची पुरवणी परीक्षा यासंदर्भातली ही बातमी आहे. बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलैपासून 12 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. तर दहावीची पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यामुळे खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा, पुन्हा अभ्यास करा आणि पास व्हा! तारखा मात्र लक्षात ठेवा.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश बंद करण्याची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 11 वीच्या प्रवेशाची अंतिम तारीख 10 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता कुठल्याही क्षणी यासंदर्भातली माहिती सुद्धा जारी केली जाऊ शकते.