मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘गट ड’ संवर्गातील विविध पदांसाठीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. येत्या रविवारी, 31 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर ती पार पडेल. चोख व्यवस्थापनासह पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा पार पडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आल्याची माहिती या परीक्षेचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘न्यासा कम्युनिकेशन’ने दिली आहे.
कोरोनाकाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाची ही भरती परीक्षा राज्यातील तरुणांसाठी शासकीय सेवेत दाखल होण्याच्या दृष्टीने उत्तम संधी आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘गट ड’ संवर्गातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय 78 कार्यालयांमधील तब्बल 3462 रिक्त पदे या परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. त्यासाठी 31 ऑक्टोबर 2021 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून या परीक्षेच्या प्रवेशपत्र वितरणाची ऑनलाईन प्रक्रिया मंगळवार, 26 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
‘गट ड’ संवर्गातील पदांच्या भरती परीक्षेसाठी तब्बल 4,61,497 उमेदवारांनी अर्जनोंदणी केली असून त्यांपैकी सुमारे 3 लाख 60 हजार उमेदवारांनी आपले परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड केले आहे. या परीक्षेद्वारे भरली जाणारी काही पदे जिल्हास्तरीय असल्याने काही उमेदवारांनी एकाहून अधिक जिल्ह्यांतील पदांसाठी स्वतंत्र अर्जनोंदणी केली होती. अशा उमेदवारांना त्यांच्या प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र प्रवेशपत्र देण्यात येत आहे. त्यापैकी कोणत्या जिल्ह्यातील पदासाठी परीक्षा द्यायची याचा निर्णय परीक्षार्थींनी स्वत:हून करायचा आहे. असे परीक्षार्थी ज्या जिल्ह्यातून संबंधित प्रवेशपत्राद्वारे परीक्षा देतील, त्यांचे मूल्यांकन त्याच संबंधित जिल्हास्तरीय पदांसाठी केले जाईल, असेही ‘न्यासा कम्युनिकेशन’ने स्पष्ट केले आहे. परीक्षार्थींना त्यांच्या नोंदणीकृत वैयक्तिक ईमेल आणि मोबाइल क्रमांकावर प्रवेशपत्राबाबतचे तपशील पाठविण्यात आल्याचेही ‘न्यासा कम्युनिकेशन’ने सांगितले आहे. तरीही परीक्षार्थींना प्रवेशपत्राबाबत काही शंका अथवा समस्या असल्यास 9513315535, 7292013550 या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन ‘न्यासा कम्युनिकेशन’ने केले आहे.
राज्यभरातील तब्बल 1364 केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच सत्रात सर्व पदांसाठी ही परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी पार पडेल. परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्थेचे निकष पुढीलप्रमाणे ठरवण्यात आले आहेत –
• प्रत्येक जिल्हा हा स्वतंत्र विभाग असेल. प्रत्येक जिल्हयांतर्गत असणारी कार्यालये आणि त्यांअंतर्गत असणारी पदे यांसाठी एकत्रित गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
• परीक्षार्थींनी एकाहून अधिक जिल्ह्यांतील पदांसाठी अर्ज केला असल्यास अशा परीक्षार्थींसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रवेशपत्र वितरित करण्यात आले आहे. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षार्थी परीक्षेस बसतील त्याच जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत संबंधित परीक्षार्थींचा विचार केला जाईल.
• अशाप्रकारे एकाहून अधिक प्रवेशपत्रे असलेल्या परीक्षार्थींनी कोणत्या प्रवेशपत्राच्या आधारे परीक्षा द्यायची याचा निर्णय स्वत:हून करावा.
कोरोनाकाळात होत असलेली ही परीक्षा राज्य शासनाच्या कोरोनाविषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून पार पडेल. परीक्षा केंद्राच्या निर्जंतुकीकरणासह परीक्षार्थींसाठी निर्जंतुकीकरण आणि तापमान तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच परीक्षेबाबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन वा गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षार्थींनी 020 26122256 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा arogyabharti2021@gmail.com या ईमेल पत्त्यावर माहिती पाठवावी. परीक्षा प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून परीक्षार्थींनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत ‘न्यासा कम्युनिकेशन’ने या परीक्षेद्वारे निवड केवळ गुणवत्तेच्या आधारावरच होणार असल्याचे स्पष्ट केले.
‘गट क’ संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी 24 ऑक्टोबर रोजी परीक्षा झाली. या परीक्षेची उत्तरतालिका (अन्स्वर की) प्रसिद्ध झाली असून याबाबत काही आक्षेप असल्यास परीक्षार्थींनी www.arogya.maharashtra.gov.in किंवा arogyabharati2021.in या संकेतस्थळांवर आवश्यक पुराव्यानिशी नोंदवावेत, असे आवाहन ‘न्यासा कम्युनिकेशन’ने केले आहे.
इतर बातम्या :
Modi Invites Pope Francis: पोपचं भारतात 22 वर्षांनी आगमन होणार?#G20RomeSummit #G20Italy #PMModi #PopeFrancis #ModiAtG20 #PopeFrancisinIndiaVisit #ModiInItaly #VaticanCity https://t.co/X8dBhurC0I
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2021
(Maharashtra Health Department Group D Cadre Recruitment Examination on 31st October Group C examination answer sheet published)