पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचं वेळापत्रक पुढील आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला होता. तर, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यंदा 2022 मध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक एक महिना अगोदर जाहीर करणार आहे. आयोगाकडून वेळापत्रक साधारणपणे डिसेंबरमध्ये जाहीर केलं जातं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगन 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांच अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध करणार आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात आयोगाकडून पुढील वर्षाच अंदाजित वेळापत्रक जाहीर केलं जातं, मात्र यंदा नोव्हेंबरमध्येच वेळापत्रक जाहीर होत असल्यानं विद्यार्थ्यांना परीक्षांचा अंदाज येणार आहे.
आयोगाच्या प्रचलित पद्धतीनुसार सन २०२२ मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबर २०२१ अखेरीस प्रसिद्ध करण्यात येईल
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) September 9, 2021
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. 200 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती.
कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाचा प्रश्न यामुळं परीक्षा 6 वेळा लांबणीवर टाकण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी पुण्यात चक्काजाम आंदोलन केल्यावर एमपीएसीनं 21 मार्चला परीक्षा झाली होती. 200 पदांसाठी मुख्य परीक्षेसाठी 3 हजार 212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची उत्सुकता लागून राहिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुढील आठवड्यात मुख्य परीक्षांच्या तारखा जाहीर करणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 12 ऑगस्टला 413 पदांसाठी पसंतीक्रम नोंदवण्याचं आवाहन केलं होतं. विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवले होते. मात्र, आज नवा आदेश काढत पसंतीक्रम न दिलेल्या विद्यार्थ्यांना पदक्रमांकानुसारचं नियुक्ती मिळणार आहे, असं जाहीर केलंय. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये नव्या आदेशानं संभ्रम निर्माण झाला आहे. आयोगानं परत एकदा पसंतीक्रम मागवावेत अशी मागणी राज्यसेवा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
हेही पाहा
Maharashtra Public Service Commission will issue State Service Main exam dates in next Week