मुंबई : चंद्रकांत दळवी समितीचा अहवाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC) सादर करण्यात आलाय. लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे या समितीचा अहवाल सुपूर्द करण्यात आलेला आहे. गट अ आणि गट ब च्या पूर्व परीक्षा (Exams) कशा असाव्यात, अभ्यासक्रम (Syllabus) कसा असावा आणि मुख्य परीक्षेचं स्वरूप काय असावं, या शिफारशींचा या अहवालात समावेश आहे. या समितीमध्ये माजी अप्पर पोलीस महासंचालक आणि एस एफ पाटील माजी कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांचा समावेश होता. आज हा अहवाल सादर करण्यात आलाय.
दरम्यान 4 सप्टेंबर 2021 ला एमपीएससी गट ब ची पूर्व परीक्षा झाली होती ज्या परीक्षेत काही प्रश्न चुकले होते. याचीच मुख्य परीक्षा 29 जानेवारीला होणार होती मात्र परीक्षेत काही प्रश्न चुकले म्हणून विद्यार्थी न्यायालयात गेले या विषयाचा निकाल अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेस विलंब होतोय. एमपीएससीनं ‘एमपीएससी गट ब’ संदर्भातली जाहिरात 2022 मध्ये जाहीर केली होती. पण प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे प्रकरण न्यायालयात गेलं, प्रकरणाचा न्यायालयाचा निकाल आणि मुख्य परीक्षा दोन्हींना विलंब झाला. या सगळ्या समस्यांवर एमपीएससी आयोग कुठलाही तोडगा काढत नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. यासंबंधी तोडगा निघाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील विद्यार्थ्यांकडून देण्यात आलाय.