मुंबई : तुम्ही बेरोजगार असाल आणि काहीतरी नवा उद्योग सुरु करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण आता प्रधानमंत्री रोजगार सृजन योजनेसाठी (PM Employment Generation scheme) तुम्हाला मुलाखत देण्याची आवश्यकता नाही. या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करताना नमूद केलेल्या डॉक्यूमेंट्सच्या आधारावर तुम्हाला रिपोर्ट कार्ड तयार करावं लागेल. या रिपोर्ट कार्डवर 100 पैकी 50 गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची या योजनेसाठी निवड होईल. कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा परिस्थितीत पंतप्रधान रोजगार सृजन योजनेबाबत आलेली माहिती ही सध्याच्या नकारात्मक वातावरणातील सकारात्मक बातमी मानावी लागेल. ग्रामोद्योग अधिकारी एलके नाग यांच्याकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा?
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला pmmodiyojana.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. या वेबसाईटवर पात्रता, डॉक्यूमेंट्स याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या योजनेसाठी 35 टक्के कोठा हा आरक्षित उमेदवारांसाठी असेल तर 25 टक्के कोठा हा जनरल उमेदवारांसाठी असेल.
किती व्याज द्यावं लागेल?
स्वरोजगार योजने अंतर्गत (PM Employment Generation scheme) घेतल्या गेलेल्या कर्जावर 4 टक्क्यांचं व्याज द्यावं लागेल. इतर व्याज हे सरकार भरेल. या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 50 वयोगटातील असावं. याशिवाय टेक्निकल क्षेत्राशी संबंधित प्रोजेक्ट सादर करणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल.
सॅनेटायझर बनवण्यासाठी देखील अर्ज करु शकता
सध्याच्या कोरोना काळात तुम्ही सॅनेटायझर बनवण्याच्या व्यवसायासाठी देखील तुम्ही अर्ज दाखल करु शकता. या व्यतिरिक्त बुटीक, डिस्पोजल आयटम, पीठ दळायची गिरणी यासंबंधित व्यवसायासाठी देखील अर्ज दाखल करु शकता. या योजनेअंतर्गत स्वयंसेवा संस्थाही अर्ज दाखल करु शकतात.
आता ऑनलाईन अर्ज करा
विशेष म्हणजे या योजनेला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा देण्यात आली आहे, जेणेकरुन त्यांना कार्यालयात जाण्याची आवश्यकता पडू नये. दरम्यान, अर्जदारांनी अर्ज दाखल करताना सर्व डॉक्यूमेंट्स जमा केले आहेत की नाही याची पडताळणी करावी. कारण त्याच्याच आधारावर त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
हेही वाचा : भल्याभल्यांना जे जमत नाही ते पठ्ठ्यानं केलं, दुसऱ्याच्या प्रेमात पडलेल्या बायकोचं थेट लगीन लावून दिलं!