देशातील सर्वात मोठ्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत बंपर भरती निघाली आहे. देशातील TCS म्हणजेच टाटा कंन्सल्टेंसी सर्व्हिसेज या आयटी कंपनीत फ्रेशर्ससाठी चांगली संधी आहे. कंपनीने 2024 मध्ये B Tech, BE, MCA, MSc आणि MS झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. किती जागा भरणार हे आता जाहीर केलेले नाही. परंतु मागील वर्षी 40,000 जागा भरण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली होती. यामुळे आता ही प्रक्रिया 40,000 जागांसाठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
TCS कडून भरतीसाठी तीन गट तयार करण्यात आले आहे. त्यात नींजा, डिजिटल आणि प्राइम आहे. निंजा प्रकारात ₹3.36 लाख, डिजिटल प्रकारात ₹7 लाख आणि प्राइम गटात ₹9 लाख ते ₹11 लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे. लेखी परीक्षा घेऊन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
टीसीएसमधील नोकरीसाठी 10 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर 26 तारखेला लेखी चाचणी परीक्षा होणार आहे. TCS व्यवस्थापनाने जानेवारीमध्ये सांगितले होते की 2024-25 या आर्थिक वर्षासाठी फ्रेशर्सची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कंपनी सध्या महाविद्यालयांना भेट देत आहे.
बिझनेस प्रोसेसिंग स्पेशालिस्टसाठी देखील रिक्त जागा सोडल्या आहेत. कंपनी कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवीधरांना संधी देणार आहे. या पदवीधरांना बिझनेस प्रोसेसिंग स्पेशालिस्ट (BPS) म्हणून नियुक्त केले जाणार आहे. TCS वेबसाइटच्या करिअर पेजनुसार, सर्व अर्जदारांना 14 एप्रिलपूर्वी नोंदणी करावी लागेल.
तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी TCS मधील कर्मचाऱ्यांची संख्या 10,669 ने घटून 603,305 वर आली आहे. टीसीएस 12 एप्रिल रोजी FY2024 चे चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल सादर करेल. यामध्ये ॲट्रिशन माहितीचाही समावेश असेल. TCS चे एचआर प्रमुख मिलिंद लक्कड यांनी डिसेंबरमध्ये सांगितले होते, आम्ही पुढील वर्षासाठी आमची कॅम्पस भरती प्रक्रिया सुरू करणार आहोत.