पालघर : दुर्गम भागात शिक्षणाची (Education) दुरावस्था असताना इच्छाशक्तीच्या जोरावर अभ्यासाची (Study) जिद्द यातून स्वतःला सिद्ध करत डहाणू तालुक्यातील गंजाड दाभेपाड्यात आदिवासी तरुण संजय शिडवा वायडा याने राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत अव्वल येण्याचा बहुमान पटकावला आहे. आदिवासी समाजामध्ये त्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावून वर्ग-2 च्या अधिकारी (Officer) पदापर्यंत मजल मारली आहे अर्थात त्याच्या या संघर्षमय प्रवासाचा जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेने त्याच्या पंखांना पाठबळ दिल्यामुळे हे शक्य झाल्याचे संजय म्हणतो, संजयच्या ह्या यशाने कुटुंबीयांनी आता आमचे चांगले दिवस येणार असल्याचं मत व्यक्त केलंय.
घरात अठरा विश्व दारिद्र. शेतकरी वडील व फुगा फॅक्टरीत मोलमजुरी करणारी आई यांनी स्वतःचे आयुष्य खर्ची घालून संजयला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. या प्रोत्साहनातून त्याने शिकण्याची आस उरी बाळगली. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करून त्याने या पदापर्यंत मजल मारली आहे.
जिल्हा परिषदेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर अनेक खाचखळगे टप्प्याटप्प्याने पार करत त्याने स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला यादरम्यान या परीक्षेची तयारी करत असताना अभियांत्रिकी असूनही कंपनीत सुमारे वर्षभर सोळा सोळा तास मोलमजुरी करून त्याने जिवाचे रान केले व याच पैशातून अभियांत्रिकी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली, परिसरात शिक्षणाचा मागमूस नसलेल्या संजयने आपण ही परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होऊ असा चंग बांधला. घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण नसल्याने त्याने मार्गदर्शन केंद्र निवडण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले याच वेळी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशी त्याला माहिती मिळाली व संजय मधील गुण ओळखून निलेश सांबरे यांनी आपल्या संस्थेच्या कुशीत घेऊन त्याची तयारी करून घेतली.
यादरम्यान त्याला अनेक मार्गदर्शक यांसह त्याला मदत करणारे मित्र व शिक्षक परिवार लागला यातूनच त्याचा आत्मविश्वास वाढला. एका खेड्यातून आलेल्या या मुलाने महाराष्ट्राच्या इतिहासात आदिवासी समाजातून चमचमणाऱ्या कार्याचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरला, जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी संजयचे भरभरून कौतुक केले व त्याचा सत्कारही केला.
जगाच्या पाठीवर कुठेही असो इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही करता येते हे संजयच्या प्रयत्नाने स्पष्ट झाले आहे.
इतर बातमी :