नांदेड: सकाळी पाच वाजता उठायचं एजंसीला जायचं, तिथून वर्तमानपत्राचे गट्ठे उचलायचे आणि सायकलवर घरोघरी जाऊन वाटायचे असा शुभम संतोष कोडगिरवारचा नित्यक्रम. काल दहावीचा रिझल्ट (SSC Results 2022) लागला आणि शुभमला परीक्षेत दहावीत 82 टक्के गुण मिळाले! वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलेला शुभम सकाळी पेपर (News Paper) टाकून घरी येऊन मग शुभम शाळेत जायचा,अभ्यास (SSC Examination Study) करायचा. इतक्या लहान वयात परिस्थितीचं भान ठेऊन त्यानुसार योग्य ती मेहनत घेणारे मुलं कमीच! शुभमने काम करून इतके गुण मिळवले आहेत जे खरंच कौतुकास्पद आहे
आपल्याला मुलाला शिकवण्यासाठी शुभमच्या आईने स्वतः तुटपुंज्या मानधनावर ग्रंथालयात काम केले. यापूर्वी त्यांचा मोठा मुलगा शंतनू हासुद्धा पेपर टाकून दहावीत 78 टक्के गुणांनी पास झाला होता. दोन्ही मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव होती. शुभमने सुद्धा लहान वयातच आईला हातभार लावायला सुरुवात केली. आपल्या शिक्षणाचा खर्च स्वत: करण्यासाठी तो रोज सकाळी पेपर वाटत होता. आता त्याने दहावीचे शिक्षण नुसते पूर्ण केले नाही तर दणक्यात 82 टक्क्यांसह पूर्ण केलंय असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या या कर्तृत्त्वामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
शुभम संतोष कोडगिरवारच्या या यशाबद्दल त्याचं खूप कौतुक होतंय. ज्या मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव असते, परिस्थितीवर मात करण्याची ज्यांची इच्छा आणि मेहनत करायची तयारी असते अशा मुलांना आयुष्यात योग्य त्या वेळी मदतीचा हात मिळणं गरजेचं असतं. समाजातील दानशुर व्यक्तीचा मदतीचा हात मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटनी मिळू शकते. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याधापक , शिक्षक, शिक्षिका, वृत्तपत्र विक्रेते बंडू अण्णा संगेवार, पत्रकार संदिप कामशेट्टे, किशोर संगेवार, ज्ञानेश्वर डोईजड, महेताब संदीप पिल्लेवाड, शेख, दत्तात्रय कांबळे, नामदेव श्रीमंगले यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले. या यशामुळे शुभममध्ये आत्मविश्वास वाढला असून त्याने आता येणा-या प्रत्येक परीक्षेत चिकाटीने अभ्यास करून यश मिळविण्याचा निर्धारही केलाय.