मुंबई– कोविड प्रकोपामुळे सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध होते. त्यामुळे भारतासह जगभरातील अनेक कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडला. पायाभूत सुविधांसह इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ सोयीचे ठरले. मात्र, लवकरच ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा बंद होण्याच्या मार्गावर आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच आपल्या आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामासाठी रुजू व्हावे लागण्याची शक्यता आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार बहुतांश कर्मचाऱ्यांनी ‘वर्क फ्रॉम ऑफिस’च्या पर्यायाला अनुकूलता दर्शविली आहे. नामांकित आयटी कंपन्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला किमान 50 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून कामासाठी हजर राहण्याचे आदेश बजावण्याची शक्यता आहे.
कंपन्यांची धोरण आखणी
तब्बल दोन वर्षांच्या अंतरानंतर आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी पुन्हा कार्यालयातून काम करण्यासाठी सज्ज होणार आहेत. कोविड नियमावलीनुसार कंपनी व्यवस्थापनांनी प्लॅनची आखणी केली आहे. एका अहवालानुसार, नामांकित आयटी कंपन्या कोविडच्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती विचारात घेऊन किमान 50 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये कामावर हजर राहण्यासाठी आदेश बजावणार आहेत. कार्यालयाच्या जागेच्या रचनेत बदल, कॅब सुविधा सहित अन्य सुविधांचा आढावा घेतला जात आहे. नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना आपल्या ऑफिसला रुजू व्हावे लागण्याची दाट शक्यता आहे.
महिंद्रांचा ‘न्यू नॉर्मल’चा नारा
नामांकित उद्योजक महिंद्रा ग्रुपचे (Mahindra Group) प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ बाबत अनुकूल मत व्यक्त केले आहे. आपणा सर्वांच्या जीवनाचा ‘वर्क फ्रॉम होम’ अविभाज्य हिस्सा आहे. त्यामुळे कोविड प्रादूर्भाव संपल्यानंतरही कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची सुविधा मिळत राहील असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.
कर्मचारी अनुकूल, कंपन्या प्रतिकूल
कोविड नियमांमुळे अद्यापही कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास अनुकूल नाहीत. मात्र, कर्मचारी कार्यालयातून काम करण्यास उत्सुक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र, सहकर्मचाऱ्यांचे लसीकरण, कोविड अनुरुप व्यवहारांचे पालन अशा अटींवर काही कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यास अनुकूलता दर्शविली आहे.
सर्वेक्षणाचे आकडे बोलतात…
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने भारतासहित अन्य 33 देशांतील कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात सहभागी 78 टक्के कर्मचाऱ्यांनी सह-कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या मुद्द्याला प्राधान्य दर्शविले आहे. लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नियमित चाचणीसाठी 74 टक्के कर्मचारी आग्रही आहेत आणि 81 टक्के कर्मचाऱ्यांनी मास्क परिधान करणे अनिवार्य करण्याचे सुचविले आहे. सर्वेक्षणाच्या अनुसार भारतातील 90 टक्के कर्मचाऱ्यांनी सह-कर्मचाऱ्यांचे लसीकरण व 84 टक्के कर्मचाऱ्यांनी चाचणी व 73 टक्के कर्मचाऱ्यांनी मास्क अनिवार्य करण्य़ाविषयी मत प्रदर्शित केले आहे.