मालेगावः शहराच्या अगदी मध्यवस्तीत झालेल्या तब्बल 12 लाखांच्या घरफोडीने मालेगाव हादरले आहे. बारा बंगला भागातल्या नवजीवन हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिलीप भामरे यांच्या घरी चोरट्यांनी ही हातसफाई केली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या घरफोडीचा तपास सुरू केला आहे.
डॉक्टर गोव्याला
मालेगावमधील बारा भागात डॉ. दिलीप भामरे यांचे नवजीवन हॉस्पिटल आहे. डॉ. भामरे 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरच्या दरम्यान गोव्याला गेले होते. या काळात पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी डॉक्टरचे घर फोडले. डॉ. भामरे गोव्याहून परत आल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी श्वान पथकासह परिसराची पाहणी केली. ठसेतज्ज्ञांनी येथील ठसे घेतले आहेत. चोरट्यांनी तिसऱ्या मजल्यावरील घरातील कपाटाचा दरवाजा आणि तिजोरी ही डुप्लीकेट चावीने उघडल्याचा संशय आहे.
हा मुद्देमाल लंपास
चोरट्यांनी लॉकरमधील हिरे, माणिक-मोती, प्रवाळ प्लॅटीनम सोन्याचे एकूण 7 तोळ्यांचे दागिने लंपास केल्याचा अंदाज आहे. त्यात एक 30 हजार रुपये किमतीची प्रवाळची लाल रंगाची बांगडी, 30 हजारांची कर्णफुले, 50 हजारांची हिऱ्याची अंगठी, हिऱ्याची इअररिंग, दोन तोळ्याची सोन्याची माळ, ब्रेसलेट, सोन्याची ठुशी, मंगळसूत्र, तीन अंगठ्या, सोन्याचे कडे, नथ अदा मुद्देमाल लंपास केला आहे.
हिरे, माणिक-मोत्यांवर डल्ला
चोरट्यांनी 1 लाख रुपये किमतीचा पांढऱ्या खड्यांचा हिऱ्याचा हार, सव्वा लाखाचा प्लॅटीनम नेकलेस, 40 हजारांचा पाचूचा हार, 40 हजारांचा लाल माणिकांचा हार, दीड लाखाची पांढरे हिरे लावलेली बांगडी, दीड लाखाची प्लॅटीनम धातूची बांगडी, 45 हजारांची माणिक लावलेली बांगडी असा किमती ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे.
नागरिकांमध्ये भीती
ऐन शहराच्या मध्यवस्तीमधून चोरट्यांनी बारा लाखांची चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवाळीपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात शेतवस्तीत दरोडे टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय नाशिकमध्येही एकाच आठवड्यात तीन खून झाले आहेत. पोलिसांनी गुन्हेगारांचा ताबडतोब बंदोबस्त करावा. नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
नाशिक जिल्ह्यात 6 नगरपंचायतीसाठी 402 अर्ज; देवळा येथे 4, निफाड 3, कळवणला 2 प्रभागांमधील निवडणूक रद्द
Nashik ZP | झेडपीतले कारभारी वाढणार; गटात 11 आणि गणात 22 ची वाढ, तरण्याबांड नेतृत्वाला संधी…!