परभणीत अल्पवयीन मुलीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार, पीडितेचं विषप्राशण, सहा दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी

| Updated on: Sep 20, 2021 | 11:44 PM

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. पुणे, अमरावती, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांपाठोपाठ आता परभणी जिल्हा देखील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने हादरला आहे.

परभणीत अल्पवयीन मुलीवर तिघांकडून सामूहिक बलात्कार, पीडितेचं विषप्राशण, सहा दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी
minor girl
Follow us on

परभणी : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना कधी संपतील? हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. पुणे, अमरावती, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांपाठोपाठ आता परभणी जिल्हा देखील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने हादरला आहे. परभणीच्या सोनपेठ तालुक्यात एका 16 वर्षीय मुलीवर तीन नराधमांनी मिळून बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अत्याचारानंतर पीडितेने विष प्राशण करुन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. पीडितेला तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केलं. पण सहा दिवसांच्या उपचारानंतर पीडितेची प्राणज्योत मालवली.

गावातील तरुणाकडून पीडितेची छेड

पीडित मुलगी ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. गावातील मुलगा आदर्श शिंदे हा पीडितेची वारंवार छेड काढायचा. पीडितेने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली. पीडितेच्या कुटुंबियांनी आदर्शला समजावून सांगितलं. त्यानंतर सर्व प्रकरण मिटलं असेल, असं पीडितेच्या कुटुंबियांना वाटलं. पण प्रकरण मिटण्याऐवजी आणखी चिघळलं होतं. या दरम्यान 14 सप्टेंबरला दुपारी एक वाजता पीडितेने विषारी द्राव्य प्राशण केलं. त्यामुळे पीडितेला उलट्या होऊ लागल्या. पीडितेच्या आईने तिला त्यामागील कारण विचारलं असता तिने विष प्राशण केल्याचं सांगितलं. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

पीडितेचा रुग्णालयात मृत्यू

पीडितेच्या आईने तातडीने घरातील इतर सदस्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पीडितेला तातडीने आंबेजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचारानंतर पीडितेला पुढील उपचारासाठी लातूरला नेण्यात आलं. पीडितेने जवळपास सहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. पण तिची ही झुंज अखेर अपयशी ठरली. लातूरच्या रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण सोनपेठ तालुका हादरला आहे.

पीडितेने भावाला आत्महत्येचं कारण सांगितलेलं

पीडितेने आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला? याबाबतची माहिती तिने स्वत: 18 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता आपल्या भावाला सांगितली होती. पीडितेने भावाला दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी पाच या दरम्यान आदर्श शिंदे याने फोन करुन तरुणीला गावाजवळील एका पडक्या शाळेत बोलावले. यावेळी तिथे त्याच्यासोबत मयुर मुंजा मुठाळ, सुशिल भागवत शिंदे हे दोघंही होते. त्या तिघांनी मिळून पीडितेवर बलात्कार केला. त्यामुळे मानसिकरित्या खचलेल्या पीडितेने 14 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता विषारी द्राव्य प्राशण करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पीडित तरुणी जवाब देण्याच्या स्थितीत नसल्याने तरुणीच्या मामाने या प्रकरणी सोनपेठ पोलिसात तक्रार दिली आहे. मामाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात कलम 376, 354 डी, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन सोनपेठ तालुक्यात संताप व्यक्त केला जातोय.

हेही वाचा :

जैसे ज्याचे कर्म तैसे.., चोरीसाठी दोन साथीदारांना घेऊन इमारतीवर चढला, चौथ्या मजल्यावर तोल गेला आणि….

चिमुकले शेततळ्याजवळ खेळत होते, खेळता-खेळता पाण्यात गेले, तिघांचा दुर्देवी अंत, अहमदनगर हळहळलं