अ‍ॅक्सिस बँकेत चार कोटींची चोरी, पोलिसांची पळापळ, सीसीटीव्हीत बघितलं तर कुंपणच शेत खात असल्याचं उघड

| Updated on: Apr 13, 2021 | 8:00 PM

चंदिगडच्या सेक्टर 34 या परिसरातील अ‍ॅक्सिस बँकेत तब्बल 4 कोटी रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे (4 crore stolen from axis bank in chandigarh)

अ‍ॅक्सिस बँकेत चार कोटींची चोरी, पोलिसांची पळापळ, सीसीटीव्हीत बघितलं तर कुंपणच शेत खात असल्याचं उघड
अ‍ॅक्सिस बँक
Follow us on

चंदिगड : चंदिगडच्या सेक्टर 34 या परिसरातील अ‍ॅक्सिस बँकेत तब्बल 4 कोटी रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस विभागही खळबळून जागी झालं आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची प्रचंड धावपळ सुरु आहे. याप्रकरणी अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही (4 crore stolen from axis bank in chandigarh).

सीसीटीव्हीत धक्कादायक माहिती उघड

पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर धक्कादायक माहिती समोर आली. बँकेचा सुरक्षा रक्षकच बँकेतील 4 कोटी रुपये घेऊन फरार झाल्याची माहिती उघड झाली आहे. बँकेत पैशांनी भरलेले 11 ट्रँक होते. त्यापैकी 10 ट्रँक भरलेले आहेत. तर एक ट्रँक पूर्णपणे खाली आहे. सीसीटीव्ही सुमित नावाचा सुरक्षा रक्षक पैसे घेऊन पळून जाताना स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपी सुमित हा फरार आहे (4 crore stolen from axis bank in chandigarh).

पोलिसांचा कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार

याप्रकरणी पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. याप्रकरणी तपास सुरु आहे, असं म्हणत पोलिसांनी अधिक बोलणं टाळलं. दुसरीकडे अ‍ॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांनीही याप्रकरणी कॅमेऱ्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पण त्यांनी कॅमेऱ्याच्या मागे अनेक गोष्टी सांगितल्या.

बँकेच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

पंजाब पोलिसांकडून 4 सुरक्षा रक्षक पाठवण्यात आले होते. त्या चार सुरक्षा रक्षकांमध्ये सुमित हा एक होता. रविवारी (11 एप्रिल) सुमितची ड्युटी लावण्यात आली होती. विशेष म्हणजे सेक्टर 34 च्या अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी तो नेहमी येत असे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिसांचा तपास सुरु

पोलिसांनी याप्रकरणी सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो ज्या भागात वास्तव्यास होता त्याठिकाणी पोलिसांनी घटना घडल्यापासून अनेकवेळा छापा टाकला. पण सर्व प्रयत्नात पोलिसांच्या हाती निराशाच लागली. पोलीस त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. तसेच नेमका सुमितच चोर आहे की आणखी दुसरं काही कारण आहे याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा : आधी सोशल मीडियावर मैत्री, भेटून गोड बोलून तरुणाला कपडे काढायला लावले, अश्लील व्हिडीओ बनवला, नंतर ब्लॅकमेल