बंगळुरूच्या महालक्ष्मी हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अश्रफ नावाचा व्यक्ती या गुन्ह्याचा सूत्रधार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. आता या प्रकरणात महिलेच्या हत्येतील मुख्य संशयित तिच्यासोबत काम करणारी व्यक्ती असू शकते असा देखील अंदाज आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. कर्नाटकच्या राजधानीत महिलेचा मृतदेह फ्रीजमध्ये 50 हून अधिक तुकड्यांमध्ये सापडला होता. आतापर्यंत पोलिसांनी महिलेच्या सहकाऱ्याची ओळख सार्वजनिक केलेली नाही.
बंगळुरू पोलिसांनी महालक्ष्मीसोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीवर संशय व्यक्त केलाय. ज्याची ओळख मुक्ती अशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते दोघेही एकत्र काम करायचे. सुत्रांचे असेही म्हणणे आहे की, मुक्तीने महिलेच्या दुसऱ्या पुरुषासोबतच्या जवळच्या संबंधांना विरोध केला होता. पण सध्या तरी पोलिसांनी कोणतीही माहिती उघड केलेली नाही.
वृत्तानुसार, मुक्तीचा फोन बंद लागत असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. ओडिशा-पश्चिम बंगाल सीमेवर मुक्तीचा शोध सुरू आहे. 23 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले होते की, या प्रकरणातील मुख्य संशयित हा ओडिशाचा आहे, परंतु तो बंगळुरूमध्ये राहतो. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
याआधी महिलेच्या पतीने अश्रफ नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता. महिलेच्या पतीने सांगितले की, महालक्ष्मी आणि अश्रफ यांच्यात प्रेमसंबंध होते. 29 वर्षीय महालक्ष्मी या सेल्सवुमन होती. 21 सप्टेंबर रोजी तिचा मृतदेह एका घरात फ्रीजमध्ये तुकड्यांमध्ये सापडला होता. मृतदेहाचे 50 हून अधिक तुकडे झाल्याचे वृत्त आहे.
हालक्ष्मीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या शरीराचे ५९ तुकडे झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तिचे तुकडे करण्यापूर्वी तिला विषबाधा झाली होती की नाही हे तपासण्यासाठी तिचा आतड्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. फॉरेन्सिक तज्ज्ञ रेफ्रिजरेटरवर सापडलेल्या बोटांचे ठसेही तपासत होते.
महालक्ष्मीच्या आईने सांगितले की, रक्षाबंधनाच्या दिवशी तिला शेवटचे पाहिले होते. इमारतीच्या मालकाने मला सांगितले की घरातून दुर्गंधी येत आहे. मी येऊन दरवाजा उघडला तेव्हा मला महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे झालेले दिसले. रक्षणाबंधनाच्या दिवसापासून तिचा फोन बंद आहे. पीडितेच्या मोठ्या बहिणीने आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.