हैदराबाद : सिकंदराबादमध्ये (Secunderabad) एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत (Hyderabad Hotel Fire) 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झालेत. आग (Secunderabad Rubi Hotel Fire) लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आता आगीवर नियंत्रणही मिळवण्यात यश आलं आहे. पण या भीषण अग्नितांडवात 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हैदराबादच्या सिकंदराबादमध्ये स्टेशनपासून जवळच असलेल्या रुबी हॉटेलमध्ये आग भडकली होती. रुबी हॉटेलच्या बेसमेन्टला एका इलेक्ट्रिक गाड्यांचं शोरुम होतं. या शोरुममधील एका इलेक्ट्रीक बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला आणि आग लागली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केलं आणि संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.
रुबी हॉटेलात 20 पेक्षा जास्त पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे. 23 ते 25 पर्यटक रुबी हॉटेलमध्ये थांबलेले होते. आगीमुळे धुराचे लोट लगेचच हॉटेलच्या रुममध्ये शिरले. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास अडचणी येऊ लागल्या. गुदमरल्यामुळे काही जण बेशुद्ध पडले आणि आगीच्या कचाट्यात सापडले. पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
A fire broke out in an Electrical Bike Showroom in Secundrabad causing thick smoke and flames. Several guests staying in a lodge located on the upper floor of the building were trapped. Firemen trying to rescue all. At least two casualties were reported. #Hyderabad pic.twitter.com/3WnqzOfbs6
— Ashish (@KP_Aashish) September 12, 2022
दुसरीकडे आग लागल्यामुळे संपूर्ण इमारतीत खळबळ उडाली होती. परिणामी काही लोकांनी रुमच्या खिडक्या उघडल्या आणि खिडकीतून थेट खाली उड्या टाकल्या. त्यामुळेही काही जण जखमी झाल्याचं कळतंय. आतापर्यंत 10 जण जखमी झालेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
स्थानिकांनी तातडीने प्रसंगावधान राखत काही जणांना हॉटेलच्या बाहेर काढलं. त्यामुळे काही जणांचा जीव थोडक्यात वाचलाय. बचावलेल्या लोकांना स्थानिकांचे आभार मानलेत. हैदराबाद पोलीस, अग्निशमन दल यांच्याकडून या संपूर्ण घटनेची आता कसून चौकशी केली जातेय. आग आटोक्यात आली असली तर इमारतीचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.
दोन फायर इंजिनच्या मदतीने अग्निशमनने ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे आग आटोक्यात आली. मात्र 8 जणांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जातेय. तसंच मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे. स्टेशनपासून रुबी हॉटेल एकदम जवळ आहे. त्यामुळे हॉटेलात बाहेरुन आलेले लोकच थांबलेले होते. या सगळ्या लोकांनी आगीच्या या घटनेमुळे प्रचंड धास्ती घेतलीय. रुबी हॉटेलातील अग्नितांडवप्रकरणी आता पुढील तपास केला जातोय.