डोंबिवली : सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीची आता गुन्हेगारीचं शहर अशी ओळख निर्माण होत आहे. शहरातील गुन्हेगारी थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. क्षुल्लक कारणातून एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात घडली आहे. मोबाईल क्रमांकाचा गैरवापर होईल या भीतीने जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला दलाल आणि त्याच्या अन्य साथीदारांनी मिळून बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या कानाचा पडदा फाटला आणि पायाचे बोट तुटले आहे. महिलेच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मोहम्मद हमजा, मोहम्मद अनश आणि त्यांचा एक भाऊ अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित महिला नोकरदार आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलेला सतत एका दलालाचा फोन येत होता. महिलेला तिचे घर विकण्याबाबत तो दलाल विचारणा करायचा. मात्र आपण कुणाला नंबर दिला नसल्याने आपल्याला हे फोन का येतात असा प्रश्न महिलेला पडला. आरोपी दलाल आणि महिला एकाच सोसायटीत राहत असल्याने महिलेला वाटले या दलालाने आपला नंबर दिला असावा.
याबाबत विचारणा करण्यासाठी महिला आरोपीच्या घरी गेली. तिने आरोपीला त्याने आपला नंबर कुणाला दिला का याबाबत विचारणा केली. मात्र दलालाला याचा राग आला आणि त्याच्यासह त्याच्या साथीदारांनी मिळून महिलेला मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या पायाच्या बोटाला गंभीर दुखापत तर झालीच, शिवाय कानाचा पडदाही फाटला आहे. पोलिसांनी हल्लेखोर मोहम्मद हमजा, मोहम्मद अनश आणि त्यांचा एक भाऊ अशा तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय सहारे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.