कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दिव्यांग पती आणि दोन मुले सोडून एक महिला (Women) प्रियकरासह गुजरातला पळून गेली होती. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी एक बेवारस मृतदेह (Deadbody) सापडल्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी ती आपलीच मुलगी असल्याचा कांगावा केला आणि तिच्या हत्येप्रकरणी जावयाला तुरुंगात (Jail) पाठवण्याचीही तयारी केली होती. मात्र महिलेची हत्या झालीच नव्हती, असा उलगडा होताच महिला व तिच्या माहेरील लोकांचे पितळ उघडे पडले.
पोलिसांनी बेवारस मृतदेहाची डीएनए चाचणी केली. त्या चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात होती. त्यादरम्यान दिव्यांग पती जागोजागी आपल्या बायकोचा शोध घेत होता.
याचदरम्यान अचानक त्याची पत्नी जिवंत घरी परतली. मात्र त्याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली नाही.
अचानक दीड वर्षानंतर महिलेचा दिव्यांग पती मोहम्मद गुलाब याला आपली पत्नी माहेरी परतल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे गुलाबने लगेचच पोलिसांसह आपली सासुरवाडी गाठली.
तिथे पत्नी सीमाला जिवंत पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. पोलिसांनी सीमाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
चाकेरी येथील काशीराम येथे एका पोत्यात महिलेचा बेवारस मृतदेह पोलिसांना आढळला होता. त्यावेळी सीमाच्या नातेवाईकांनी त्या मृतदेहाची ओळख पटवली होती. तो मृतदेह सीमाचाच असल्याचा दावा तिच्या आईने केला होता.
कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली होती. तसेच त्याचवेळी जावयावर संशय घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
दिव्यांग पतीला आपल्या पत्नीचा सगळा प्रताप लक्षात आल्यानंतर मोठा धक्का बसला आहे. त्याने पत्नीसोबत संसार न करण्याचे ठरवून तिच्यापासून घटस्फोट मागितला आहे. यासाठी त्याने पोलिसांची मदत मागितली आहे.
या पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते, असे अधिक तपासात उघड झाले आहे. त्याच वादातून गुलाबची पत्नी यापूर्वीही अनेकदा घर सोडून माहेरी गेली होती. सध्या पोलीस सीमाची कसून चौकशी करीत आहेत.
हे प्रकरण लवकरच उघड होईल. तसेच खोटा दावा करण्यात आलेला मृतदेह कोणाचा होता, याचाही शोध घेतला जात आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.