उत्तर प्रदेश : प्रेमाचे भूत उतरवण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने एका 20 वर्षीय दलित मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अयोध्येत उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोंदूबाबाविरोधात बलात्कार, एससी, एसटी कायद्यासह अघोरी विद्येच्या नावाखाली पैसे घेणे अशा विविध कलमान्वये गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. पीडितेचे दिल्लीत राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध (Love Affair) होते. ही बाब घरच्यांना कळताच त्यांनी प्रेमाचे भूत दूर करण्यासाठी मुलीला सिया बल्लभ कुंज नयाघाट येथील महंत हनुमानदास याच्याकडे नेण्याचा विचार केला. महंत फुंकर मारून प्रेमाचा रोग दूर करतात असे घरच्यांनी ऐकले होते.
भोंदूबाबाने बुधावरी सायंकाळी भूत उतरवण्यासाठी मुलीला घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीचे कुटुंबीय तिला घेऊन तेथे गेले. त्यानंतर भोंदूबाबाने झाडणी करण्याच्या बहाण्याने मुलीला एका रुममध्ये नेले. तर तिच्या कुटुंबीयांना बाहेर झाडाजवळ प्रार्थना करण्यास सांगितले. रुममध्ये त्याने मुलीवर बलात्कार केला.
भोंदूबाबाकडून कुटुंबीय मुलीला घरी घेऊन गेल्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. याबाबत नातेवाईकांनी तात्काळ अयोध्या पोलिसांत तक्रार दाखल केली. माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी महंत हनुमान दास याला तात्काळ अटक केली. चौकशी आणि तपासानंतर पोलिसांनी महंतविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
आरोपी महंत हनुमान दास हा विवाहित असून त्याला तीन मुलीही आहेत. हनुमान दास हा बर्याच कालावधीपासून भूत उतरवण्याचे काम करतो. त्यामुळे त्याचे कुटुंबीय मंदिराच्या दुसऱ्या खोलीत राहतात. ज्या मंदिरात ही घटना घडली त्या सिया बल्लभ कुंज मंदिरात सियाबल्लभ कुंजचे माजी महंत अयोध्या दास यांनी 1989 मध्ये श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या नावाने एक नोंदणीकृत मृत्युपत्र केले होते. त्यामुळे या मंदिराबाबत आचार्य सत्येंद्र दास आणि कथित महंत हनुमान दास यांच्यातही खटला सुरू आहे. (A young woman was assaulted by Bhondubaba out of superstition in Uttar Pradesh)