पुणे : ऑनलाईन गेम खेळणे एका कॅब चालकाच्या जीवावर बेतला आहे. ऑनलाईन जंगली रमीमध्ये 20 हजार रुपये हरल्याने नैराश्येतून तरुणाने जीवन संपवल्याची घटना मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेमध्ये घडली आहे. गणेश काळदंते असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. गणेश हा कॅब चालक होता. तसेच त्याला मद्यपान आणि ऑनलाईन जंगली रमी खेळण्याचं व्यसन होतं, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली. याच व्यसनातून त्याने टोकाचे पाऊल उचलले. ऑनलाईन मोबाईल गेममुळे अनेक जण आपले बँक खाते रिकामे करत आहेत. तसेच ऑनलाईन गेमच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनाही वारंवार घडत आहेत.
गणेश काळदंते हा तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे. तो चालक असून स्वतःची गाडी आहे. परंतु गणेशला मद्यपान आणि ऑनलाईन गेम जंगली रमीचं व्यसन जडलं. तो मोबाईलवर जंगली रमी खेळायचा. रविवारी गणेश घरात सर्व कुटुंबीय बसलेल्या असताना त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीच त्याचे जंगली रमीमध्ये वीस हजार रुपये गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलीस व्यक्त करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.