यवतमाळ / विवेक गावंडे : अंघोळीसाठी नदीवर गेलेल्या तरुणाचा पाण्यात वीजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. अशोक विठ्ठल कुरमेलकर असे मयत तरुणाचे नाव आहे. ऐन अक्षय तृतियेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. अशोक कायम नदीवर अंघोळीसाठी जात असे. नेहमीप्रमाणे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अशोक अंघोळीला गेला. मात्र ही अंघोळ त्याची शेवटची ठरली. यामुळे अक्षय तृतियेच्या सणाला गालबोट लागले आहे. याप्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
अशोक कायम नदीवर अंघोळ करत असे. नेहमीप्रमाणे आज सकळी तो पैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेला. मात्र यादरम्यान पाणी ओढण्याच्या मोटारीची वायर नदीच्या पाण्यात पडली होती. परिणामी नदीच्या पाण्यात वीज प्रवाह संचारला. अशोक याबाबत अनभिज्ञ होता. यामुळे त्यामुळे त्याने नेहमीप्रमाणे अंघोळीसाठी नदीत उडी घेतली. नदीत उडी घेतल्यानंतर पाण्याला स्पर्श करताच त्याला शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
अशोकच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. पांढरकवडा पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. ऐन सणाच्या दिवशी तरुणाच्या मृत्यमुळे हळहळ व्यक्त होत आहे.