मुंबई : अल्पवयीन मुलींना टार्गेट करुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करुन पसार व्हायचा. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले पण तो हाती लागत नव्हता. अखेर एका फोनमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अय्याज मोहम्मद अन्सारी असे अटक आरोपीचे नाव आहे. अन्सारी हा लैंगिक छळ आणि लैंगिक अत्याचाराच्या 25 हून अधिक प्रकरणात गुन्हेगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने 2017 आणि 2018 मध्ये बलात्काराच्या दोन खटल्यांत अन्सारीला दोषी ठरवले होते. दुसऱ्या खटल्यात त्याला दोषी ठरविल्यानंतर न्यायालयाने हा पुनरावृत्तीचा गुन्हा मानला. त्याच अनुषंगाने अन्सारीला त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी तुरुंगात पाठवण्याचे निर्देश दिले.
नराधमाला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. तसेच गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. मात्र आरोपी काही हाती लागत नव्हता. यादरम्यान पोलिसांनी पीडितांकडून आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. कुणी त्याच्या विशिष्ट चालीबाबत सांगितले, कुणी त्याच्या डोळ्याच्या अपंगत्वाबाबत सांगितले. यानंतर पोलिसांनी पीडितांनी सांगितलेल्या वर्णनानुसार त्याचे एक स्केच जारी केले.
दरम्यान, पोलिसांनी त्याच्याबाबत माहिती घेण्यासाठी त्याच्या घरी गेले. मात्र त्याच्याशी आपला सहा महिन्यांपासून संपर्क नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यादरम्यान अन्सारीने पैशासाठी भावाला फोन केला. त्याच्या भावाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. अन्सारीच्या भावाने पैसे घेण्यासाठी त्याला भेटायला बोलावले. याचवेळी परिसरात दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. अशा प्रकारे अखेर हा नराधम पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
आरोपी अल्पवयीन मुलींना टार्गेट करायचा. त्यांना आपण त्यांच्या वडिलांचा मित्र असल्याचे भासवायचा. मग त्यांच्या वडिलांना आपला नंबर द्यायचा असल्याचे सांगत आपल्यासोबत निर्जन ठिकाणी न्यायचा. तिथे त्यांच्यावर अत्याचार करायचा. अनेक पालकांच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी त्याचे स्केच जारी करुन तपास सुरु केला. सर्व गुन्ह्यातील मो़डस ऑपरेंडी सारखीच असल्याने हे सर्व गुन्हे एकाच व्यक्तीने केल्याची पोलिसांची खात्री पटली.