बदलापूरच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जातोय. राज्यातील राजकीय वातावरण देखील या घटेनेमुळे तापलं आहे. महाविकास आघाडीने या घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या घटनेचे पडसाद अनेक ठिकाणी बघायला मिळाले आहेत. पण या घटनेनंतरही राज्यातील महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. बदलापूरपासून अगदी काही किलोमीटर अंतर असलेल्या शेजारच्या अंबरनाथ शहरातही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथमध्ये एका 35 वर्षीय इसमाने अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीला शौचालयात नेत, तिला अश्लील चित्रफित दाखवत विनयभंग केला. या घटनेमुळे अंबरनाथ शहरातही खळबळ उडाली आहे.
बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण ताजं असतानाच आता अंबरनाथमध्येही एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 35 वर्षीय नराधमाने एका 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला शौचालयात नेत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथ शहरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता तिथे आरोपी संतोष कांबळे याने तिला अश्लील चित्रफित दाखवून विनयभंग करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने 21 ऑगस्टलाअंबरनाथ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपी संतोष कांबळे याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.