मुंबई : नऊ वर्षांपूर्वी त्याने देवळात देवाचे दागिने चोरले होते. परंतू त्यानंतर त्याच्या आयुष्यातील एक क्षणही चांगला गेला नाही, त्याच्या आयुष्यात लागोपाठ अशा काही घटना घडल्या की त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. या दागिन्यांच्या चोरीनंतर त्याचा प्रत्येक मिनिट पश्चातापाने व्यतित झाला होता. आपण असे का केले ? याचा त्याला मिनिटा मिनिटाला पश्चाताप झाला. ती नऊ वर्षे त्याला काही चांगली गेली नाहीत, मग त्याने देवाचे ते सारे दागिने परत करण्याचा निश्चय केला…
ओडीशाच्या भुवनेश्वर जवळील गोपीनाथपूर मंदिरात सोमवारी मंदिराचे विश्वस्थांच्या घराबाहेर एक मोठी बेवारस पिशवी सापडली. त्या पिशवीला देबेश कुमार मोहंती यांनी घाबरतच उघडले. तर आत मध्ये देवाचे चांदीचे दागिने आणि दोन इंग्रजीत लिहीलेल्या चिट्ट्या सापडल्या. कोणी अनामिकाने त्यात देवाचे दागिने चोरल्याबद्दल माफी मागितली होती. चांदीच्या दागिन्यांच्या पिशवित 301 रुपये देखील ठेवलेले होते. त्यातील 201 रूपये दक्षिणा म्हणून तर 100 रुपये केलेल्या गुन्ह्याबद्दलचा दंड म्हणून असे त्यात त्या अनामिक चोराने लिहीले होते.
चोराने लिहीलेल्या चिट्टीत लिहीलेले होते की आपण देवळात यज्ञ सुरू असताना देवाचे दागिने चोरले. परंतू गेल्या नऊ वर्षांत मला खुप संकटं आणि अडीअडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे देवाला शरण जाण्याचा निर्णय घेतला असून देवाचे सर्व दागिने परत करीत आहे. मी माझे नाव आणि पत्ता गावाचे नाव लिहीलेले नाही, देवा मला माफ करा…असे लिहीले.
साल 2014 च्या मे महिन्यात एका चोरट्याने देवळातील देवाच्या अंगावरील सर्व दागिने चोरले. एकूण दागिन्याची किंमत चार लाखांच्या घरात होती. चोरीला गेलेल्या दागिन्यात भगवान कृष्णाचा मुकूट, कर्ण फुले, बाजूबंद बासरी आणि अन्य दागिने यांचा समावेश होता. गोपीनाथपूर येथील महत्वाचे प्रस्थ असलेल्या देबेश मोहंती यांच्यावतीने मंदिरात यज्ञ सुरु असताना देवाचे दागिने चोरीला गेले होते. नंतर त्यांनी लिंगराज पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदविली होती. पोलीसांनी या प्रकरणाचा तपासही केला होता. काही पुजाऱ्याची चौकशी देखील केली होती. परतू काहीही धागेदोरे हाती लागले नव्हते.
आता इतक्या वर्षांनी देवाचे दागिने जसच्या तसे सापडल्याने देवळाचे पुजारी कैलास पंडा यांनी हा एक चमत्कारच असल्याचे म्हटले आहे. पोलीसांना चोरट्याला शोधण्यात काही यश आले नसल्याने तसेच देवाचे दागिने काही सापडत नसल्याने आम्ही देवाला नव्याने दागिने बनविले. शेवटी चोरट्याला देवानेच सुबुद्धी दिली आणि शिक्षा केली असे पंडा यांनी म्हटले आहे.