अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण, CID पथक लागलं कामाला, मुंब्रा बायपास रोडवर तपासाला वेग

| Updated on: Sep 24, 2024 | 6:49 PM

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सीआयडीकडे तपास सुपूर्द करताच सीयआयडीचं पथक कामाला लागलं आहे. सीआयडीचं पथक तपासासाठी घटनास्थळी दाखल झालं आहे.

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण, CID पथक लागलं कामाला, मुंब्रा बायपास रोडवर तपासाला वेग
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण, CID कामाला लागले
Follow us on

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात अतिशय वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. नवी मुंबईचे सीआयडी अधिक्षक हे तपासाचे प्रमुख आहेत. संबंधित प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर सीआयडी पथक तातडीने कामाला लागलं आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडी पथक मुंब्रा बायपास परिसरात दाखल झालं आहे. एन्काउंटर घडलेल्या स्पॉटवर सीआयडीकडून तपास केला जातोय. मुंब्रा बायपास रोडवर जी घटना घडली त्या घटनास्थळाची ते पाहणी करत आहेत. सीआयडीची टीम घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. सीआयडी अधिकाऱ्यांकडून अतिशय बारकाईने घटनास्थळी तपास केला जातोय. पथकाकडून मोबाईलच्या माध्यमातून फोटो काढले जात आहेत. घटना नेमकी कुठे घडली आणि कशाप्रकारे घडली? याचा तपास पोलिसांकडून केला जातोय.

ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून माहिती जारी

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात ठाणे पोलिसांकडून अधिकृतपणे प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी 05.30 वाजता सदर आरोपी अक्षय शिंदे यास नमूद पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेतले. त्यास घेवून ठाणे येथे येत असताना, 06.00 वा. ते 6.15 वाजेच्या दरम्यान पोलीस वाहन मुंब्रा बायपास येथे आले असता, सदर आरोपी अक्षय अण्णा शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी सपोनि/निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले आणि पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 01 राऊंड सपोनि/निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला आणि 02 राऊंड इतरत्र फायर झाले.

स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने 1 गोळी फायर केली असता आरोपी अक्षय शिंदे यास लागून तो जखमी झाला. पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस सपोनि/निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदे यास उपचारकामी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय येथे आणले असता, डॉक्टरांनी तपासून सपोनि/निलेश मोरे आणि इतर पोलीस यांना पुढील उपचारकामी ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पीटल येथे रेफर केले. आरोपी अक्षय शिंदे यास तपासून मयत घोषित केले आहे. सदर मृत आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नियमानुसार सर जे जे हॉस्पीटल, मुंबई येथे करण्याची तजवीज ठेवली आहे, असं पोलिसांनी अधिकृतपणे सांगितलं आहे.