जळगाव : चोरी करणारा व्यक्ती पोलीस दिसताच आपला मार्ग बदलतो. त्याला आपण पकडला गेलो तर जेलची हवा खावी लागणार याची भीती असते. पोलिसांसमोर चोरी करण्याचे धाडस कोणताही चोरटा करत नाही. परंतु जळगाव जिल्ह्यातील एका घटनेमुळे पोलीस अन् चोर यांच्यासंदर्भात असणारी व्याख्याच बदलावी लागणार आहे. एका चोरट्याने कॅबिनेट मंत्र्यांची सुरक्षा भेदून चोरी केली. त्याने कॅबिनेट मंत्र्यांचा खिशाच साफ केला. मंत्रीच सुरक्षित नाही तर सामान्य कसे राहणार? अशी चर्चा या घटनेनंतर सुरु झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यातील मंत्रिमंडळात रविवारी नऊ जणांचा शपथविधी झाला. त्यात अजित पवार यांच्यासोबत आलेले अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचाही समावेश झाला. शपथविधीनंतर अनिल पाटील प्रथमच जळगाव जिल्ह्यात आले. त्यांच्या अमळनेर मतदार संघात गेल्यावर शहरातील एका दर्शनासाठी गेले. त्यावेळी चोरट्याने धाडस केले. त्यांची सुरक्षा व्यवस्थी भेदली. त्यांच्या खिश्यातून पाकीट लंपास केले.
मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे पाकीट चोरट्याने पोलीस बंदोबस्त असताना लांबवले. त्यात 830 रुपये दोन एटीएम आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती. कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांचे सुरक्षा कवच तोडून ही चोरी झाली आहे. यामुळे मंत्र्याच्या खिश्यात हात घालणाऱ्या चोरट्याची चर्चा अमळनेर शहरात सुरु आहे. या प्रकरणी ७ जुलै रोजी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद विचुरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुनिल पाटील करत आहे.