उत्तर प्रदेश : मृत समजून ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले तो 30 वर्षांनी घरी सुखरुप परतला आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. वृद्धाची वेदनादायी कहाणी ऐकल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. रामकिशुन नामक व्यक्तीला 30 वर्षे बंदिवासात (Confinement) ठेवून काम करायला लावले आणि जेव्हा त्याचे शरीर थकले तेव्हा त्याला त्याच्या घरी सोडण्यात आले. त्याच्या पुनरागमनामुळे कुटुंब आनंदी आहे. पण त्याची दयनीय अवस्था पाहून कुटुंबीयांना वाईटही वाटले. विशेष म्हणजे या वृद्धाचा मृत्यू झाला समजून कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार (Funeral) केले होते. आता वृद्धाचे कुटुंबीय न्यायाची मागणी (Demand for Justice) करत आहेत.
रामकिशूनचे निर्जीव शरीर आणि त्यावरील खुणा त्यांच्या वेदनादायक कहाणी सांगण्यासाठी पुरेशा आहेत. या वृद्धाने जवळपास 30 वर्षांपासून सहन केले आहे. 16 वर्षांपूर्वी कुटुंबाने त्यांचे अंतिम संस्कारही केले होते. 30 वर्षांनंतर जिवंत परतलेला रामकिशून हा मुगलसराय भागातील लेदुआपूर गावचा रहिवासी आहे.
सुरुवातीला तो सोनभद्र जिल्ह्यातील ओब्रा पॉवर हाऊसच्या कॅन्टीनमध्ये काम करत होता. तेथून अचानक गायब झाला. त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी गेल्या सोमवारी तो आपल्या घरी परतला. मात्र, त्यांच्या शरीरातील एका बाजूचे अवयव काम करत नव्हते.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 30 वर्षांपूर्वी ते ओब्रा येथे काम करत असताना ते मैहर देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर काही लोकांनी त्यांना फसवून मुंबईला नेले. तिथे त्यांना मिठाईच्या कारखान्यात ठेवले आणि 15 वर्षे ओलीस ठेवण्यात आले.
यादरम्यान कसा तरी रामकिशून तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाला आणि वाराणसीच्या कॅन्ट स्टेशनवर पोहोचला. येथून पुन्हा एकदा त्यांना बळजबरीने बाबतपूर विमानतळाजवळील ढाब्यावर नेले आणि तेव्हापासून ते त्यांना ओलीस ठेवत राहिले.
यादरम्यान रामकिशूला अनेक प्रकारची औषधे दिल्याचेही सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून काम करवून घेतले जात होते आणि नंतर औषध देऊन झोपवण्यात यायचे. मात्र याच दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्यांना डाव्या बाजूला अर्धांगवायू झाला होता. त्यामुळे एक पाय आणि एक हात काम करणे बंद झाले. त्यानंतर काही लोक त्यांना त्यांच्या घरी सोडून निघून गेले.