अहमदाबाद : ड्रग्ज तस्करी (Drug Smuggling)चा गोरखधंदा करणाऱ्यांची अजूनही गुजरातलाच पहिली पसंती असल्याचे नव्या कारवाईमधून उघड झाले आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर एका पाकिस्तानी बोट ताब्यात (Boat Detained) घेण्यात आली. त्या बोटीतून तब्बल 200 कोटी रुपये किमतीचे 40 किलो ड्रग्ज (Drugs) पंजाबला नेले जात होते. सुरक्षा दलांनी विशेष मोहीम हाती घेऊन हा ड्रग्जसाठा जप्त केला आहे.
ड्रग्जचा साठा घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी मच्छिमारी बोटने भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. गुजरात किनारपट्टीपासून भारतीय हद्दीत सहा मैल अंतरावर ही बोट जप्त करण्यात आली आहे. या ड्रग्जची पंजाबमधील तुरुंगातून ऑर्डर देण्यात आली होती, असे गुजरात पोलिसांनी सांगितले.
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानी बोट अल तय्यासा ही गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीपासून 33 नॉटिकल मैल अंतरावर ताब्यात घेतली. या बोटीमध्ये सहा क्रू मेंबर्स होते. त्यांना अटक करून पुढील तपासासाठी जखाऊ येथे आणण्यात आले.
गुजरातच्या किनारपट्टीवर हेरॉईन उतरवल्यानंतर ते रस्त्याने पंजाबमध्ये नेण्यात येणार होते. गुप्त माहितीच्या आधारे पाकिस्तानची बोट अडवली आणि सहा पाकिस्तानी नागरिकांना पकडले. त्यांच्याकडून 40 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती तटरक्षक दल आणि एटीएसमधील अधिकाऱ्यांनी दिली.
गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना या कारवाईबद्दल सविस्तर माहिती दिली. पंजाबच्या तुरुंगातून ड्रग्ज तस्करांच्या टोळ्यांची सूत्रे हलली जातात.
आतापर्यंत अमृतसर कारागृह, कपूरथळा कारागृह, फरीदकोट तुरुंगात बंदिस्त असलेल्या गुन्हेगारांना पाकिस्तान आणि इतर देशांतून ड्रग्ज मिळत असल्याची माहिती मिळाली आहे.
पंजाबच्या तुरुंगात बंदिस्त असलेले कैदी मोबाईल फोन वापरत आहेत. व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे ते ड्रग्जची ऑर्डर देतात. त्यानुसार त्यांच्यासाठी भारतात ड्रग्ज पाठवले जात असल्याचे उघडकीस आले आहे.
अमृतसर येथील तुरुंगात एक नायजेरियन नागरिक आणि कपूरथळा तुरुंगातील आणखी एक कैदी अंमली पदार्थांचे तस्कर आहेत. त्यांना हे ड्रग्ज पाकिस्तानातील कराची येथून मिळाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
ड्रग्जच्या तस्करीतील कैद्यांच्या सहभागाने तुरुंग प्रशासनही हादरून गेले आहे. तस्करीचा हा गोरखधंदा रोखण्यासाठी तुरुंगाच्या आवारातील सुरक्षा आणखी मजबूत करण्याची मागणी जोर धरत आहे. याचवेळी गुजरातच्या किनारपट्टीवरून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीच्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.