औरंगाबाद: बनावट धनादेशाद्वारे बंगळुरू येथील टोयोटा-किर्लोस्कर (Toyota Kirloskar ) मोटर कंपनीच्या सीएसआर फंडातून 36 कोटी 51 लाख रुपयांची रक्कम लाटण्याचा प्रयत्न फसल्याची घटना औरंगाबादेत घडली. बनावट धनादेश तयार करून तो बँकेट वठवण्यासाठी टाकल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. या प्रकरणी खुलताबाद येथील महालक्ष्मी शिक्षण सांस्कृतिक क्रीडा वाचनालय प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मी उमेश भारती यांना अटक करण्यात आली आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अजित बाळासाहेब जाधव यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार, 4 सप्टेंबर 2020 रोजी ICICI बँकेने ईमेलवरून टोयोटा किर्लोस्कर कंपनीला कळवले की, एमआयडीसी वाळूज येथील शाखेत 25 ऑगस्ट 2020 रोजी महालक्ष्मी शिक्षण सांस्कृतिक क्रीडा आणि वाचनालय प्रसारक मंडळ या नावाच्या संस्थेने 36 कोटी 51 लाख रुपयांचा धनादेश टोयोटा कंपनीच्या सीएसआर फंडातून वठवण्याकरिता दिला होता. मात्र धनादेशासंबंधी बँकेला शंका आल्याने त्यांनी ही माहिती टोयोटा कंपनीला कळवली. मात्र असा कोणालाही धनादेश दिला नसल्याचे कंपनीकडून कळवण्यात आले. बँकेने तो धनादेश रद्द केला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.
आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दादाराव सिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने या प्रकरणी तपास केला. बनावट धनादेशावर टोयोटा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मासाकाजू योशीमुरा आणि टाकुया नाकानिशी यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचे व बनावट शिक्के मारल्याचे तपासात समोर आले. याशिवाय महालक्ष्मी संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात असून संस्थेचे कार्यालय खुलताबादेत आहे. पोलिसांनी या प्रकरणी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी उमेश भारती यांना अटक केली आहे. आरोपींनी बनावट धनादेश व बनावट शिक्के कोठे तयार केले. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची हुबेहुब स्वाक्षरी कशी केली, याचा तपास पोलीस करत आहे. हे एका व्यक्तीचे काम नसून यात अनेकजण सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.
इतर बातम्या-