औरंगाबादः दोन सुरुक्षारक्षक (Security) असूनही तब्बल पाच दरोडेखोरांनी शहरातील पगारीया बजाज शोरुमवर (Pagaria Showroom) दरोडा (Robbery) घातल्याच्या घटनेमुळे औरंगाबाद शहरात सध्या भीतीचं वातावरण आहे. धक्कादायक म्हणजे, अवघ्या 20 ते 25 मिनिटात या दरोडेखोरांनी तीन ठिकाणी तोडफोड करून दोन तिजोऱ्यांमधील रक्कम पळवली. या दरोड्यात चोरट्यांनी 15 लाख 43 हजार 247 रुपयांवर डल्ला मारला. गुरुवारी पहाटे एके ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी सहा वाजता घटना उघडकीस आली. त्यानंतर ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. कडक सिक्युरिटी असतानाही चोरट्यांनी ही हिंमत दाखवल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पगारीया शोरुमचे अॅडमिन अभिषेक अमिताभ रॉय हे बुधवारी रात्री पावणे दहा वाजता शोरुममधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी सर्व चाव्या व्यवस्थापक कमलेश मुनोत यांच्याकडे दिले. सगळे घरी गेले. रात्रीच्या वेळी राजेंद्र सोनवणे आणि राव अण्णा गारेल्लू हे दोघे सुरक्षा रक्षक म्हणून ड्यूटीला होते. रात्री ११ वाजेनंतर पाऊस सुरु झाला. त्यामुळे ते दोघे चारचाकी विक्री दालनाच्या बाजूने बसले. पाऊस सुरु होता, त्यामुळे ते तेथच बसून राहिले.
गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता सुरक्षा रक्षकांना जाग आली तेव्हा त्यांनी शोरुमच्या चबुबाजूंनी फेरी मारली. यावेळी दुचाकी विक्री दालनाच्या बाजूचे शटर उचकटलेले दिसले. सिक्युरीटी गार्डनी तत्काळ अॅडमिन यांना फोन करून ही माहिती दिली. घडला प्रकार क्रांति चौक पोलीस स्टेशनला कळवण्यात आला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करण्यात आला.
केवळ 20 मिनिटातच चोरट्यांनी पगारीया शोरुममध्ये ही धाडसी टोरी केली. दुचाकी विक्री दालनाच्या बाजूचे शटर उचकटले. चौघांनी आत प्रवेश केला. थेट तिजोरी अससलेल्या कॅश काऊंटरकडे गेले. तिजोऱ्या उचलल्या. समोरच पँट्री रुमच्या खिडकीच्या काचा फोडून तिजोऱ्या बाहेर टाकल्या. या घटनेत 15 लाख 43 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे पोलिसांच्या चौकशी अंती उघड झाले आहे. शोरुमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात दरोडेखोरांनी काही वेळ तिजोऱ्या फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या फुटल्या नाहीत. त्यानंतर त्या गोलवाडी छावणी रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला नेल्या. तेथे मोठाले दगड घालून तिजोऱ्या फोडल्या. त्यातले पैसे काढून घेतले. रिकाम्या तिजोऱ्या त्याच ठिकाणी टाकून दरोडेखोर पळून गेले.