औरंगाबाद : शेजारच्यांशी भांडण झालं म्हणून संतापात एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एक वर्षीय सोहमचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आई आणि दोन वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनंतर त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. आई आणि दोन वर्षीय चिमुकलीची सध्या मृत्यूशी झुंच सुरु आहे (Aurangabad woman attempt suicide after dispute with neighbor).
नेमकं प्रकरण काय?
औरंगाबादच्या वाळूज औद्यागिक नगरीतील बजाजनगर भागात राहणाऱ्या अनिता सतीश आटकर या महिलेचं शेजारच्यांसोबत भांडण झालं. भांडणादरम्यान शेजारच्यांचे काही शब्द तिच्या मनाला लागले, म्हणून तिने संतापात आपल्या दोन्ही लहान मुलांसह स्वत:चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. तिचा एक वर्षीय सोहम नावाच्या चिमुकल्याचा यामध्ये मृत्यू झाला. तर तिची दोन वर्षीय प्रतिक्षा नावाची चिमुकली रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
घटनेमुळे परिसरात एकच खळबळ
संबंधित घटना ही आज (3 मे) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. महिलेने लहान मुलांसह अचानक उडी मारल्याने आजूबाजूच्या नागरिकांना धक्काच बसला. तीनही जण जमिनीवर पडल्यामुळे मोठा आवाज आला. त्यामुळे आजूबाजूचे लोक घराबाहेर आले. महिला आणि दोघं चिमुकले रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. तेथील स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
पोलिसांकडून तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच वाळूज एम.आय.डी. सी. पोलीस घटनस्थळी दाखल झाले आहेत. ते या घटनेची नेमकी पार्श्वभूमी काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलेचे शेजारच्यांसोबत का वाद झाला? वादामागील नेमकं कारण काय, त्यामुळेच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की आणखी दुसरं काही कारण होतं, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे (Aurangabad woman attempt suicide after dispute with neighbor).
हेही वाचा : प्रेयसी, तिची बहीण, आईला जीवे मारलं, सेशन कोर्टाकडून जन्मठेप, आरोपीची हायकोर्टात धाव, न्यायाधीशांनी झापलं