माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी दसऱ्याच्या दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेने सगळ्या मुंबईला हादरवून सोडलय. बऱ्याच वर्षांनी मुंबईत इतकी मोठी राजकीय हत्या झाली आहे. या हत्या प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या टाळता आली असती. या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित शुभम लोणकरला पोलिसांनी जाऊ दिलं नसतं, तर कदाचित ही हत्या टळली असती. सलमान खानच्या फ्लॅटवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी शुभम लोणकरला ताब्यात घेतलं होतं. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुभमची चौकशी केली होती. आज टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
सलमान खान गोळीबार प्रकरणातील संशयिताला आसरा दिला म्हणून गुन्हे शाखेने शुभमची चौकशी केली होती. पण सबळ पुरावे नसल्यामुळे त्यावेळी गुन्हे शाखेला शुभम लोणकरला सोडाव लागलं होतं. आता या प्रकरणात शुभमच नाव आल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी शुभमची चौकशी करणाऱ्या क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. शुभम लोणकरला लष्करात जायचं होतं. पण 2018-19 साली जैसलमेर येथे लष्करी भरतीमध्ये तो अपयशी ठरला होता. यावर्षी मे महिन्यात बिश्नोई गँगच्या सदस्यांनी वांद्रे येथील सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली होती.
शुभमने बाहेर राहून काय केलं?
विवेक गुप्ता, सागर पाल, हरपाल सिंग ऊर्फ हॅरी, रफीक चौधरी आणि बनवारीलाल गुजर. सहावा आरोपी अनुज थापचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला. यांच्या चौकशीत शुभम लोणकरच नाव समोर आलं होतं. त्याच्यावर आरोपीला आश्रय दिल्याचा आरोप होता. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शुभमची कसून चौकशी केली होती. पण सबळ पुराव्याअभावी त्याला गुन्ह्यामध्ये अडकवता आलं नाही. यामुळेच शुभम लोणकरला बाहेर राहून गुन्ह्यामध्ये सक्रीय होता आलं. बिश्नोई गँगसाठी त्याने नव्या शूटर्सची भरती केली.
आरोपी भंगाराच्या दुकानात काम करायचे
शुभम लोणकर बिश्नोई गँगच्या कसा संपर्कात आला? ते पोलीस शोधण्याच्या मागे लागले आहेत. शुभम लोणकरनेच सोशल मीडियावर टि्वट करुन बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकीच्या हत्येचा दावा केला. सध्या फरार असलेला झिशान अख्तर बिश्नोई गँग आणि शुभममध्ये दुवा असू शकतो. पोलिसांनी शुभमचा भाऊ प्रविणला अटक केली आहे. पुण्यात लोणकरची डेअरी होती. त्याच्यापुढे भंगाराच दुकान होतं. धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे त्या भंगार दुकानात काम करायचे.