Baba Siddique Lawrence Bishnoi : उत्तर भारतात खासकरुन हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि राजस्थानमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगने आपली प्रचंड दहशत निर्माण केलीय. हा गुन्हेगार अवघ्या 31 वर्षांचा आहे. मागच्या 8 वर्षांपासून तो तुरुंगात आहे. मात्र, असं असूनही तो तुरुंगात बसून बाहेर मोठे गुन्हे घडवून आणतोय. आता त्याने आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. त्याला बॉलिवूडमध्ये जम बसवायचा आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या हे त्या दिशेने उचलेलं एक मोठ पाऊल असल्याच मानलं जातय. सलमान खान त्याच्या मार्गातला मोठा अडसर आहे. बॉलिवूडमध्ये राज्य निर्माण करण्यासाठी त्याला सर्वात आधी डी कंपनीची दहशत संपवावी लागेल. लॉरेन्सला या कामात त्याचा खास माणून संपत नेहरा साथ देतोय. संपत नेहरा पंजाबच्या जेलमध्ये आहे. नेटवर्कच्या माध्यमातून त्याने मुंबईत गुन्हेगारांची टोळी उभी केलीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईने संपत नेहराच्या सल्ल्यावरुन आपला पॅटर्न चेंज केला आहे. आता लॉरेन्सकडून कुठल्याही कामाची जबाबदारी त्याच्या खास माणसावर सोपवली जाते.
लॉरेन्सचा हा साथीदार स्वत: शूटर हायर करतो. त्यांना ट्रेनिंग देऊन शस्त्र उपलब्ध करुन देतो. या शूटर्सना त्यांच्या टार्गेटबद्दल फार माहिती दिली जात नाही. हे गुन्हेगार पकडले गेल्यानंतर जेलमध्ये त्यांची व्यवस्था लॉरेन्स बिश्नोईकडून केली जाते. याच पॅटर्न अंतर्गत बाबा सिद्दीकींची हत्या झाली. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना त्यांच्याबद्दल काही माहित नव्हतं. आता प्रश्न हा आहे की, उत्तर भारतात वर्चस्व बनवल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई आता मुंबईत का विस्तार करतोय?.
लॉरेन्सला सलमानवर अंतिम प्रहार करायचाय
मागच्या 12 वर्षात लॉरेन्स बिश्नोईने प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या हत्येचा सहावेळा अयशस्वी प्रयत्न केला. दोनवेळा त्याचे साथीदार टार्गेटजवळ पोहोचून लक्ष्यभेद करु शकले नाहीत. आता लॉरेन्सला सलमानवर अंतिम प्रहार करायचा आहे. बॉलिवूडवर ताबा मिळवण्याआधी त्याला सलमानला फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेर काढायचं आहे. असं झाल्यास लॉरेन्सचा वसुलीचा धंदा वाढेल.
खास माणसं मुंबईत आणली
लॉरेंस बिश्नोईने हफ्ता वसुलीसाठी दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या रियल एस्टेट व्यावसायिकांना टार्गेट केलय. इथे कुठल्याही व्यावसायिकाने लॉरेन्सशी पंगा घेतला नाही. पण मुंबईत विरोध होऊ शकतो. त्यामुळे मुंबईत तो एका प्लानिंग अंतर्गत हातपाय पसरतोय. त्यासाठी त्याने हरियाणा आणि पंजाबमधून आपल्या अनेक विश्वासू माणसांना मुंबईत आणलय.