बदलापूर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचारी असणाऱ्या अक्षय शिंदे याने अत्याचार केला होता. त्या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. संतापलेल्या बदलापूरकरांनी अक्षय शिंदेला त्वरीत फाशी देण्याच्या मागणीसाठी रेले रोको केले होते. त्यानंतर अक्षय शिंदे एन्काऊंटर करण्यात आले. त्या प्रकरणाची धग अजूनही कायम असताना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाच मुलींचा विनयभंग करण्यात आला. ज्या शिक्षकांकडे पालक आपल्या मुलांना सोडून बिनधास्त राहतात, ज्या शिक्षकाला गुरु म्हटले जाते, त्यानेच हा प्रकार केला. शिक्षकाने केलेल्या या प्रकारानंतर मुली रडत रडत घरी आल्या अन् काय घडले ते पालकांना सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील या घटनेनंतर पुन्हा समस्त पालकवर्ग चिंतत आला आहे. बाळशीराम यशवंतराव बांबळे असे त्या शिक्षकाचे नाव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खराडी जिल्हा परिषद शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी बाळशीराम यशवंतराव बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले. दुपारच्या सुट्टीत एक मुलगी रडत रडत घरी गेली. तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या प्रकारे इतर चार ते पाच मुलींबरोबरही बाळशीराम बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले होते. मुख्यध्यापकांनी त्या सर्व मुलींना बोलवून चौकशी केली. त्यांनी त्या शिक्षकाच्या कारनाम्याचा पाढा वाचला. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
वर्गशिक्षक बाळशीराम यशवंतराव बांबळे हे शाळेत नव्याने रूजू झाले. ते शाळेत आल्यापासून असे प्रकार करत आहेत. याबाबत मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारी उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी शाळेतील या शिक्षकाविरुद्ध बीएनएस कलम ७४,७५, बालकांचे लैंगिक अत्याचार कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत.
बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणानंतर दोन दिवसांपूर्वी पुणे शहरातील प्रकरण समोर आले. पुण्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून सहा वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्या प्रकरणानंतर वानवडी पोलिसांनी संजय जेटींग रेड्डी याला अटक केली. आता अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकाने विनयभंग केला. यामुळे शाळेतही अल्पवयीन मुली सुरक्षित नाही, हे दिसून येत आहे. दोन महिन्यात तिसरी अशी घटना समोर आली आहे. यामुळे मुलींच्या पालकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.