माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी दसऱ्याच्या दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली. वांद्र्यातील मुलाच्या निर्मल नगर येथील कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संशयित शूटर्सनी मागच्या महिन्याभरात तब्बल 10 वेळा वांद्रे परिसरात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
“मोकळी जागा असल्याने मुलाच्या खेरवाडी येथील ऑफिसजवळ सिद्दीकी यांची हत्या करा, असं त्यांना सांगण्यात आलं होतं” असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. वेगवेगळ्या कारणांमुळे त्यावेळी त्यांना गोळीबार करण्याची संधी मिळाली नाही. अनेकदा सिद्दीकी आले नाहीत. काहीवेळा सिद्दीकी यांच्या अवती-भवती त्यांचे बरेच समर्थक असायचे. त्यामुळे हल्लेखोरांना आपला प्लान बदलावा लागला” हल्लेखोरांच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.
किती आरोपी अटकेत आहेत?
या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मंगळवारी उत्तर प्रदेश कैसरगंज येथून हरीशकुमार निशाद (24) या आरोपीला अटक केली. त्याला 21 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरमेल सिंग (23) आणि धर्मराज कश्यप (21) आणि डेअरी मालक प्रविण लोणकर यांना या प्रकरणात आधीच अटक झाली आहे. शुभम लोणकरने या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याची सोशल मीडिया पोस्ट केली होती. प्रविण लोणकर त्याचा भाऊ आहे. सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात शुभम लोणकरची चौकशी सुद्धा झाली होती. पण सबळ पुराव्याअभावी त्याची सुटका झालेली.
भंगाराच दुकान
हरीशकुमार निशाद पुण्यात भंगाराच दुकान चालवत होता. त्याने मागच्यावर्षी भाड्यावर चालवण्यासाठी म्हणून हे दुकान घेतलं होतं. प्रविणच्या डेअरीच्या बाजूलाच हे दुकान होतं. निशाद आपल्या गृहजिल्ह्यातून काही लोकांना त्या दुकानात काम करण्यासाठी म्हणून घेऊन आला होता.